पिंपरी : जेसीबी, कंटेनर अशी अवजड वाहने चोरीस जाण्याची शहरातील परंपरा कायम आहे. आता तर चोरट्याने कहरच केला असून, सोळा चाकी ट्रक मालासह पळवून नेल्याची घटना चिखलीमध्ये उघडकीस आली आहे. त्याच बरोबर पाच दुचाकींही चोरीस गेल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात या पूर्वी देखील अनेक अवजड वाहने चोरीस गेली आहेत. गेल्याच आठवड्यात जेसीबी घराजवळून चोरीस गेला होता. ही घटना ताजी असतानाच हरगुडे वस्ती चिखली येथून १२ ऑक्टोबरच्या सायंकाळ पासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे पर्यंत मालवाहू ट्रक घरापासून चोरीस गेली. समाधान नवनाथ खरात (वय ३०, रा. हरगुडे वस्ती चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खरात यांनी त्यांच्या राहत्या घराजवळील संजयशेठ नेवाळे यांच्या घरासमोर टाटा कंपनीचा सोळा चाकी ट्रक लावला होता. त्यात ८ लाख ७८ हजार ७७७ रुपयांचे २३ लोखंडी स्टील होते. त्यासह ट्रक नेल्याचे फर्यादीत म्हटले आहे.
राहत्या घराजवळून दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार सहदेव पुंडलिक पाटील (वय ५८, रा. अन्नपूर्णा हॉटेल जवळ, सोमाटणे फाटा, मावळ) यांनी ताळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दिली आहे. चांदणी चौक बावधन येथील बंद पेट्रोल पंपा समोरून मोपेड चोरीस गेल्याची फिर्याद अक्षय संजय कोंढरे (वय २६, माताळवाडी फाटा, मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात दिली आहे.
राहत्या घरापासून दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार कुणाल किशोर चौधरी (वय २५, अथर्व सोसायटी, ज्ञानेश पार्क) यांनी दिली आहे. पिंपळे गुरव येथील भैरवनाथ नगर येथून योगेश मधुकर रणपिसे (वय २८, संतकृपा निवास, पिंपळे गुरव) यांची मोपेड चोरीस गेली आहे. या दोन्ही प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भगवंत शंकरराव होळगे (वय ३५, रा. एकता कॉलनी थेरगाव, वाकड) यांची दुचाकी राहत्या घरापासून चोरीस गेल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
----निष्णात वाहनचोर?
जेसीबी, कंटेनर ट्रक, रोड रोलर अथवा सोळा चाकी वाहन चालविण्यासाठी विशेष कौशल्याची गरज असते. पिंपरी-चिंचवडच्या उद्योग नगरीतून अशा प्रकारची अवजड वाहने चोरीस जाण्याच्या घटना वरचेवर घडत आहेत. त्यामुळे चोरटेही विशेष वाहन कौशल्य आत्मसात करून चोरी करीत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.