पिंपरी : महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असणाऱ्या मिळकतकर विभागाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केला जाणार असून, मिळकतींची शोधमोहीम घेण्यात येणार आहे. ‘जीपीएस’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वेक्षण आणि नोंदणी करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिली. राज्य शासनाचा आदेश मिळताच महापालिकेने मिळकत आणि पाणीपट्टी वसुलीची मोहीम तीव्र केली आहे. करसंकलन विभागाने जप्तीची मोहीम सुरू केली आहे. याबाबत आयुक्त वाघमारे म्हणाले, ‘‘महापालिकेच्या उत्पन्नाचा मिळकतकर हा प्रमुख स्रोत आहे. शास्तीमुळे मिळकतकराची ३०५ कोटी रक्कम थकीत दाखविली जात होती. मिळकतकर शास्तीत शासनाने सूट देण्याचे धोरण अवलंबिले आहे. सहाशे चौरस फुटांपर्यंतच्या शास्तीतून सूट दिली आहे. त्यामुळे सुमारे १०० कोटींची रक्कम कमी होणार आहे. या संदर्भात थकबाकीदारांना जप्तीची नोटीस गेली आहे. महिनाअखेरपर्यंत थकबाकी वसुली मोहीम सुरू राहणार आहे.’’जीएसटी आल्यानंतर आपल्याला एलबीटीतून मिळणारे सुमारे १४०० कोटींच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. त्यामुळे उत्पन्नाचे स्रोत शोधणे, तसेच करवसुलीला प्राधान्य देणे गरजेचे आहे.(प्रतिनिधी)
‘जीपीएस’द्वारे सर्वेक्षण
By admin | Published: March 25, 2017 3:53 AM