संजय मानेपिंपरी : शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत वृद्धांसाठी पेन्शन दिली जाते. मात्र ही पेन्शन मिळविण्यासाठी तहसीलदार कार्यालयात समक्ष हजर राहून तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांपुढे उपस्थित राहून हयात असल्याचे सिद्ध करावे लागते. योजनेच्या लाभार्थ्यांची ही पेन्शन मिळविण्यासाठी हेळसांड होत आहे. रुपीनगरमधील एका वृद्ध दाम्पत्याला अक्षरश: रुग्णवाहिकेतून पुण्यातील तहसीलदार कार्यालयात तसेच परिसरातील बँकेत न्यावे लागते. ही एक प्रकारे हेळसांड असून, संजय गांधी निराधार योजनेचे कार्यालय आकुर्डीत होणार अशी घोषणा झाली, या घोषणेची पूर्ती होण्यास महूर्त कधी मिळणार, अशी प्रतिक्रिया लाभार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.रुपीनगर येथील द्वारका सोसायटीत राहणारे दादा सोंडगे यांनी त्यांच्या वृद्ध सासू-सासºयांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी किती कसरत करावी लागते़ याची व्यथा ‘लोकमत’कडे मांडली. मूळचे आंबेजोगाई (बीड) हे सासºयांचे गाव... त्यांनी वयाची ८० ओलांडलीय... सासूचे वय पंच्याहत्तरीच्या पुढे गेले आहे. एक मुलगा होता, त्याचे अकाली निधन झाले. आंबेजोगाईहून हे मुलीकडे आश्रयाला दोघे आले. उतार वयात शरीर साथ देत नाही. औषधोपचार सुरू आहे. शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेस ते पात्र ठरले. जावई सोंडगे मुलाप्रमाणे त्यांची काळजी घेताहेत. खासगी कंपनीतून सेवानिवृत झालेले सोंडगे यांचीही आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. सासºयांची सेवा हे कर्तव्य मानून ते त्यांच्यासाठी धावपळ करीत आहेत. ज्येष्ठ नागरिक निराधार योजनेंतर्गत सासू-सासरे यांना प्रत्येकी ६०० रुपये दरमहा पेन्शन मिळते. दोघांचे मिळून दरमहा १२०० रुपये मिळतात. पेन्शनची ही रक्कम मिळविण्यासाठी त्यांच्यासह इतरांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो आहे.
हयात असल्याचे सिद्ध करण्यासाठी वृद्धांची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 2:52 AM