पिंपरी : स्वाइन फ्लूमुळे कासारवाडीतील ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू झालेल्यांने आता बळींचा आकडा ५२ वर पोहोचला आहे. जानेवारीपासून ते अद्यापपर्यंत शहरात ३८१ रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत ३१९ रुग्णांना उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. अद्यापही १० रुग्ण शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. स्वाइन फ्लूचा विळखा वाढला आहे़ नागरिकांना भीती मात्र उरलेली नाही. दक्षतेच्याबाबतीत नागरिकांची उदासीनता दिसून येत असल्याचे वैद्यकीय अधिकाºयांचे म्हणणे आहे.कासारवाडी येथील महिलेला स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आली. १६ सप्टेंबरला तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्रास वाढल्याने त्या महिलेला त्याच दिवशी कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात आला. परंतु उपचार सुरू असताना महिलेचा शनिवारी मृत्यू झाला. स्वाइन फ्लूने मृत झालेल्यांची संख्या ५० च्या पुढे गेली आहे. स्वाइन फ्लूने शहरात गंभीर स्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेने आतापर्यंत ९ हजारांहून अधिक लोकांना टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप केले आहे. २००९ मध्ये स्वाइन फ्लूचा शहरात प्रादुर्भाव झाला़ त्या वेळची आणि आताची स्थिती याची तुलना केली असता, निश्चितच परिस्थिती गंभीर असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाºयांचे म्हणणे आहे.महापालिका जनजागृती करते आहे़ मात्र नागरिक दक्षतेच्या बाबतीत जागरूकता दाखवत नाहीत. २००९ मध्ये तोंडाला मास्क लावून नागरिक बाहेर पडत होते. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत होते. आता स्वाइन फ्लूचा विळखा आणखी वाढला असताना मात्र नागरिकांचा बेजबाबदारपणा दिसून येत आहे. याची खंत वैद्यकीय अधिकारी व्यक्त करीत आहेत. २००९ मध्ये शासनाने तातडीक सुविधा म्हणून स्वाइन कक्ष स्थापन करणे शासकीय रुग्णालयांना बंधनकारक केले होते. आता त्या पद्धतीने कक्ष स्थापन केले जात नाहीत. मात्र, टॅमी फ्लू गोळ्या व लस सर्वत्र उलब्ध करून दिली आहे.हलगर्जीपणा बेततोय जीवावरसर्दी, ताप, खोकला झाल्यास रुग्ण औषध दुकानातून स्वत: औषध, गोळ्या घेतात. एक दोन दिवस उलटल्यानंतर रुग्णालयात धाव घेतात. संबंधित डॉक्टरसुद्धा लगेच स्वाइन फ्लूचे उपचार सुरू करीत नाहीत. डॉक्टर त्यांच्याकडील औषध, गोळ्या देऊन रुग्ण बरा होण्याची प्रतीक्षा करतात. मात्र, अधिक दिवस उलटून गेल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाते. अशा वेळी रुग्णाला व्हेंटिलेटरवर (कृत्रिम श्वासोच्छवास) ठेवावे लागते. कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवलेला रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. उपचाराच्या बाबत रुग्ण आणि काही खासगी डॉक्टर यांच्याकडून हलगर्जीपणा दाखविला जात असल्याने स्वाइन फ्लूने मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे.महापालिकेतर्फे स्वाइन फ्लूची दक्षता घेण्यासंबंधी जनजागृती मोहीम राबवली जात आहे. लक्षणे आढळून येताच डॉक्टरांकडे जावे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे दुकानातून घेऊ नयेत. नियमितपणे हात स्वच्छ धुवावेत. भरपूर पाणी प्यावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सर्दी, खोकला झाल्यास असे दुखणे अंगावर काढू नये. खोकताना तोंडाला रुमाल लावावा, अशी दक्षता घेतल्यास स्वाइन फ्लूला अटकाव आणणे शक्य होईल, असे डॉ. रॉय यांनी सांगितले.अशी आहेत लक्षणेसौम्य ताप, घशात खवखव, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या, जुलाब अशी लक्षणे स्वाइन फ्लूच्या प्राथमिक अवस्थेत आढळून येतात. ताप, घसादुखी, घशाला सूज येणे, धाप लागणे, छातीत दुखणे, रक्तदाब कमी होणे, खोकल्यावाटे रक्त पडणे, नखे निळसर काळी पडणे, लहान मुलांमध्ये चिडचिड, आळस येणे अशी लक्षणे दिसून येतात.खासगी डॉक्टरांनीही स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आल्यास वेळ न दवडता रुग्णांना तातडीने स्वाइन फ्लूचे उपचार सुरू करावेत. जेणेकरून वेळीच उपचार मिळाल्यास रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी होईल. खासगी डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे. - डॉ. अनिल के़ रॉय,आरोग्य वैद्यकीय अधिकारीपिंपरी चिंचवड महापालिका
स्वाइन फ्लूचा वाढला विळखा; आठवड्याला सरासरी एक मृत्यू, बळींचा आकडा ५२ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 4:42 AM