पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या शिक्षक, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी; भ्रष्ट शिक्षक, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे थोरात यांनी याबाबत निवेदन दिले आहे. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांसह आपल्याकडे सातत्याने अनेक निवडणुका होत असतात. या निवडणुकीनिमित्त सातत्याने मतदार यादी अद्ययावत केली जाते. पिंपरी-चिंचवड शहर दिवसेंदिवस विस्तारत आहे. त्यामुळे या शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. नेमका याचाच गैरफायदा काही राजकीय व्यक्ती घेत आहेत. बोगस मतदार नोंदणी करून राजकीय स्वार्थ साधला जात आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अशा राजकीय व्यक्तींशी लागेबांधे आहेत. यातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागात अनेक शिक्षक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत आहेत. महापालिका शाळांसाठी या शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे; मात्र हे शिक्षक शाळेऐवजी महापालिकेच्या निवडणूक विभागातच अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यामुळे या शिक्षकांचे फावले आहे. महापालिकेच्या शाळांतील काही शिक्षक महापालिकेच्या निवडणूक विभागात कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)
भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा
By admin | Published: November 18, 2016 5:12 AM