पिंपरी : ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या, जुलाब या प्रकारचा त्रास पावसाळ्यात होतोच, असा सर्वांचाच समज असतो. परंतु ज्यांना अशा प्रकारची लक्षणे जाणवत असतील तर स्वत:च्या मनाने उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण ही लक्षणे स्वाइन फ्लूची देखील असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
पुणे, मुंबई शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनानंतर स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सद्य:स्थितीत स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण नसल्याचे महापालिका वैद्यकीय विभागाने सांगितले. पुणे आणि मुंबई येेथे स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्याने शहरातील नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
पुण्यात १ जानेवारी ते २६ जुलै या कालावधीत स्वाइन फ्लूच्या ४५ रुग्णांची नोंद झाली आहे. यंदा जूनच्या सुरुवातीला पुरेसा पाऊस न पडल्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण तुलनेने कमी होते. परंतु जूनमध्ये शहरात डेंग्यू, मलेरिया या आजारांनी डोके वर काढायला सुरुवात केली. त्यातच जुलैमध्ये शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला. परिणामी, शहरात साथींच्या आजाराचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली.
शहरात जूनमध्ये मलेरियासदृश आजाराच्या ८ हजार ३४२ रुग्णांची नोंद झाली होती, तर जुलैमध्ये ९ हजार २७१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर जूनमध्ये शहरात डेग्यूंच्या २९९ संशयित रुग्णांची नोंद झाली. त्यातील १७ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली होती. जुलैमध्ये डेंग्यूच्या ५०२ संशयित रुग्णांची नोंद झाली. त्यातील ३७ रुग्णांना डेंग्यू झाला. यावरून सध्या शहरात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. परिणामी, शहरातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.
स्वाइन फ्लूची लक्षणे
- ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या, जुलाब ही सर्वसाधारण स्वाइन फ्लूची लक्षणे आहेत.- गर्भवती महिला, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा रुग्णांमध्ये लक्षणे तीव्र होऊन आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो.-रुग्णाला धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, उलटीतून रक्त पडणे अशी गंभीर लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.