मोशी : मोशी गावामध्ये तलाठी कार्यालय नवीन शासकीय इमारतीमध्ये सुरू झाले असून, हे कार्यालय म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ झाल्याचे चित्र दिसून येत आहे . मोशी महापालिकेच्या शाळेजवळ प्रशासनाच्या वतीने इमारत बांधण्यात आली. सुरुवातीला या जागेवर करसंकलन कार्यालय , तलाठी कार्यालय, सफाई विभागाचे कार्यालय होते. परंतु त्या ठिकाणी वाढत्या रहदारीच्या तुलनेने जागा अपुरी पडत असल्यामुळे त्याच जागेवर सुसज्ज अशी नवीन इमारत बांधण्यात आली. त्या इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत सामान्यांची अडचण लक्षात घेऊन महापालिकेच्या शाळेमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे कार्यालय सुरू करण्यात आले. सध्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये तळमजल्यावर पार्किंग व वरील दोन मजल्यांवर तलाठी, करसंकलन, सफाई कार्यालय सुरू आहेत. परंतु तलाठी कार्यालयाची जागा अपुरी पडत असल्यामुळे नागरिकांच्या गैरसोयीत अधिकच भर पडली आहे . मोशी तलाठी कार्यालयातून मोशी , डुडुळगाव , बोऱ्हाडेवाडी परिसरातील नागरिक ये-जा करीत असतात . त्यामुळे सात-बारा उतारा, फेरफार, वारस नोंद, रेशन कार्ड संबंधित कामकाजासाठी दररोज येणाऱ्यांची संख्यादेखील जास्त आहे. अनेक महत्त्वपूर्ण नोंदीच्या कागदपत्रांचे गठ्ठे अपुऱ्या जागेअभावी इतर खोल्यांमध्ये ठेवण्यात आले आहेत. परिणामी अशी कागदपत्रे गहाळ झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)
तलाठी कार्यालय असून अडचण, नसून खोळंबा
By admin | Published: December 12, 2015 12:35 AM