पुणे : तळवडे येथील आगीच्या दुर्घटनेतील सात जखमींवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी तीन जखमींची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. विनायक काळे यांनी दिली.
सर्व जखमींचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे ससून रुग्णालय प्रशासनाने सांगितले. तर सामान्य वॉर्डमध्ये दाखल असलेल्या एका जखमीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. तळवडे येथील आगीत गंभीर जखमी झालेल्या दहा जणांना उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित सात जखमींवर उपचार सुरू आहेत. या सातपैकी तीन जखमींवर अतिदक्षता विभागात तर उर्वरित चार जणांवर सर्वसाधारण वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे म्हणाले की, ‘जखमींमध्ये काही रुग्णांच्या फुप्फुसांना इजा झाली असून, त्यांना ॲंटिबायाेटिक व सपाेर्टिव्ह केअर देणे सुरू आहे. त्यांच्यासाठी सर्व वैद्यकीय सुविधा पुरेशा आहेत. सामान्य वॉर्डमध्ये दाखल असलेल्या एका जखमीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. या जखमीला सोमवारी सकाळी चालविण्यात आले आहे.