पिंपरी : नोकरी देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी ऑनलाइन पद्धतीने इंजिनिअर तरुणीशी संपर्क साधला. नोकरीसाठी कामाचा बहाणा करून तरुणीला ऑनलाइन काम (टास्क) दिले. एक टास्क पूर्ण झाल्यानंतर तिच्या खात्यात ४०० रुपये जमा केले. खात्यात पैसे जमा होत असल्याने तरुणीला सायबर चोरट्यांवर विश्वास बसला. चोरट्यांनी त्यांच्या खात्यात पुढील टास्क देण्यासाठी तरुणीला पैसे जमा करायला सांगितले. काही पैसे जमा केल्यानंतर टास्क अपूर्ण आहे, असे सांगून अधिक रक्कम भरली तर त्यावर चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने तरुणीकडून तब्बल ३९ लाख ६९ हजार ६५६ रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली.
ही घटना सहा एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत जुनी सांगवी तरुणीच्या राहत्या घरी घडली. याप्रकरणी तरुणीने मंगळवार (दि.१८) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार फिर्यादीला संपर्क साधणाऱ्या मोबाइलधारकासह टेलिग्राम लिंक पाठवणाऱ्या फिर्यादीला टेलिग्राम ॲपची लिंक पाठविणाऱ्यासह सहा बँकेच्या खातेदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना नोकरी लावण्याच्या आमिषाने आरोपींनी ऑनलाइन संपर्क केला. फिर्यादी यांना नोकरीसाठी आरोपींनी एक ऑनलाइन टास्क दिले. हे टास्क पूर्ण झाल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या खात्यात काही पैसे जमा केले. अधिक टास्क पूर्ण करण्यासाठी फिर्यादीला एक लिंक पाठवून टेलिग्राम ॲपवरील एका ग्रुपमध्ये ॲड केले. त्यामध्ये टास्क पूर्ण झाल्याच्या बदल्यात तरुणीला चांगली रक्कम मिळाली. पुढील टास्कसाठी तरुणीला पैसे भरण्यास सांगितले. तरुणीने सुरुवातीला काही पैसे भरले; मात्र टास्क अपूर्ण आहे. टास्क पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, तुम्ही पैसे भरा, असे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यात तब्बल ३९ लाख ६९ हजार ६५६ रुपये घेतले.
मित्र मैत्रिणींकडून घेतले पैसे
फिर्यादी ही आयटीत काम करणारी तरुणी आहे. त्यामुळे तिच्याकडे असलेले बचत तिने सायबर चोरट्यांना टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली देऊन टाकली. तरी टास्क पूर्ण होत नसल्याने आणखी पैसे लागत असल्यामुळे तिने आपल्या मित्र-मैत्रिणीकडून मोठी रक्कम परत करण्याच्या बोलीवर घेतली आणि ते पैसे सायबर भामट्यांना पाठवत टास्क पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ३९ लाख रुपये जमा करूनही पैसे परत मिळत नसल्याने तिला फसवणूक झाल्याचे लक्षात आले.