जयंत धुळप/रायगड, दि. 29 - संततधार पावसामुळे लोणावळा येथील वळवण धरणाची जलपातळी ६३३.७८ मीटरपर्यंत पोहोचली आहे. यामुळे तलाव कोणत्याही क्षणी ओव्हर फ्लो होऊ शकतो. परिणामी धरण परिसरातील गावांसहीत व टाटा पॉवर कंपनीलाही सतर्कतेचा इशारा देण्यात यावा, असा संदेश भिवपूरी व खोपोली हायड्रो पॉवर स्टेशनचे प्रमुख मेंडगुडले धनप्पा डी. यांनी पुणे जिल्हा प्रशासनास मंगळवारी सकाळी पाठवला आहे.
धरण ऑव्हर फ्लो होऊन आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अग्निशमन दल आणि डायव्हर्स (पाणबूडे) तत्काळ उपलब्ध करुन द्यावेत, अशी विनंती लोणावळा येथील आयएनएस-शिवाजीच्या कंमांडीग ऑफीर्सना टाटा पॉवर कंपनीने केली आहे. या व्यतिरिक्त पुणे पूर नियंत्रण कक्ष, मावळ तहसीलदार, लोणावळा नगरपरिषद, लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा पोलीस निरीक्षक आणि धरण परिसरातील वरसोली ग्रामपंचायत यांना देखील या संभाव्य धोकादायक परिस्थितीची कल्पना टाटा पॉवर कंपनीने दिली आहे.