लोकमत न्यूज नेटवर्ककामशेत : कामशेत शहराजवळील जुना मुंबई-पुणे महामार्गाच्या पलीकडे असणाऱ्या कुसगाव खुर्द या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चौथीतील विद्यार्थिनीला शिक्षकाने जबर मारहाण केली. यात त्या मुलीच्या पाठीवर वळ उठले असून, ती शाळेत जाण्यास घाबरत आहे.वैष्णवी ज्ञानेश्वर लालगुडे (वय ९) हिला बुधवारी शाळेत वर्गशिक्षक बाळकृष्ण गणपत शिंगाडे यांनी इंग्रजीचे स्पेलिंग विचारले असता, ते सांगता आले नाही म्हणून गालावर मारले. पाठीवर धपाटे मारले. तिचे केस जोरात ओढून पाठीवर काठीने मारल्याने तिच्या पाठीवर काळे-निळे वळ उमटले.वैष्णवी शाळा सुटल्यानंतर घरी गेली असता, हात व पाठ दुखत असल्याचे आईला सांगितले. तिचे कपडे बदलताना आई वैशाली लालगुडे यांच्या लक्षात सर्व प्रकार आला. वैष्णवीची पाठ लाल झाली होती. तिच्या पाठीवरून हात फिरवला असता तिला जास्त दुखत असल्याने सरपंच सारिका लालगुडे यांना संबंधित प्रकार सांगितला. इतर विद्यार्थ्यांकडे चौकशी केली असता त्यांनाही अशा मारहाणीला अनेकदा सामोरे जावे लागले असल्याचा प्रकार समोर आला आहे. अनेक विद्यार्थी या शिक्षकाच्या भीतीने शाळेत जाण्यास घाबरत असल्याची तक्रार अनेक पालक करीत आहेत. मात्र, शिक्षण अधिकाऱ्यांना याची काहीही पर्वा नसल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.मुख्याध्यापक व वर्गशिक्षक शिंगाडे यांच्याविरोधात मागील आॅक्टोबर महिन्यात शालेय पोषण पूरक आहाराविषयी सरपंच व ग्रामस्थांनी पंचायत समितीत व गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या शिक्षकाची तातडीने बदली करावी अन्यथा त्याला निलंबित करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी मावळ शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली होती.
शिक्षकाकडून विद्यार्थिनीला मारहाण
By admin | Published: June 23, 2017 4:27 AM