भोसरी : पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी व महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी शाखेच्या वतीने एक दिवसीय शिक्षक प्रतिभा साहित्य संमेलन गुरुवारी दि. १७ आॅगस्टला अंकुशराव लांडगे नाट्यगृहात होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांची निवड करण्यात आली असून, जलसंवर्धन मंत्री प्रा. राम शिंदे व डॉ. पी. टी. पाटील उद्घाटन करणार आहेत.या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी बांधकाम व्यावसायिक सुदाम भोरे यांची निवड केली आहे.प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्षप्रा. मिलिंद जोशी, आमदार महेश लांडगे, लायन्स क्लबचे प्रांतपाल गिरीश मालपाणी, भाऊसाहेब भोईर उपस्थित राहणार आहेत.या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांचा जीवनगौरव सन्मान करण्यात येणार असून कामगारनेते दत्तात्रय येळवंडे यांना महाराष्ट्र श्रमभूषण पुरस्काराने गौरविण्यात येईल. ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक कवींचे कविसंमेलनात १२ कवी सहभागी होतील. नगरचे संजय कळमकर व कोल्हापूरचे अप्पा खोत कथाकन सादर करतील. तसेच या वेळी नवोदीत कथाकारही त्यांच्या कथा सादर करतील.राज्यभरातून शिक्षक सहभागी होणार आहेत. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शिक्षकांमधील सुप्त गुणांना वाव देण्याचे काम करण्यात येत असल्याचे संयोजकांनी सांगितले.
शिक्षक प्रतिभा संमेलन भोसरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 3:31 AM