वडगाव मावळ : शिक्षण मंत्रालयाने काढलेल्या नव्या आदेशानुसार सोमवार, दि. ९ जानेवारीपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून तो अॅन्ड्रॉईड अॅपद्वारे अपलोड करून सरकारला सादर करायचा आहे. कहर म्हणजे सेल्फी काढत असताना मोबाइलची जीपीएस सिस्टीम सुरू ठेवायची आहे. त्यामुळे फोटो कुठे काढला ते ठिकाण प्रशासनाला समजणार आहे.मावळ तालुक्यासारख्या दुर्गम भागात मोबाइलवर बोलायला रेंज नीट येत नाही, तर शाळांमधून ही जीपीएस सिस्टीम कशी चालणार, असा सवाल शिक्षकांमधून विचारला जात आहे. अगोदरपासूनच शालेय पोषण आहारासह इतर शैक्षणिक माहिती सरकार आॅनलाईनच मागवत आहे. त्यातच आता सोमवारपासून सेल्फी व पुढे हजेरीसुद्धा अशाच पद्धतीने आॅनलाइन भरावयाची आहे.शिक्षकांचा आता अधिकाधिक वेळ शिकवण्यात कमी व मोबाइलची रेंज शोधण्यात जात आहे. सरकार ही सर्व माहिती मोबाइल व इंटरनेटद्वारे मागवत असले, तरी सरकारने शिक्षकांना यासाठी कोणतीच साधने उपलब्ध करून दिली नाहीत. शिक्षकांनी स्वत:च्या पैशानेच नवा मोबाइल घ्यावा. स्वखर्चाने इंटरनेटचे रीचार्ज करावे. आम्ही फक्त वरून आलेल्या आदेशाचे पालन करत आहोत. तुम्हीही करा, असे अधिकारी वर्गाकडून सांगितले जात आहे. यामुळे शिक्षक वर्ग प्रचंड धास्तावला आहे. सामान्य शिक्षकांचा कोणीच वाली नाही, अशी चर्चा शिक्षकांमधून होत आहे. आम्ही शाळेत शिकवायचे का मोबाइलवर सगळी माहितीच भरत बसायचे, असे प्रश्न विचारले जात आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटना या विषयावर मात्र, या संदर्भात मूग गिळून गप्प आहेत. इतर काही जिल्ह्यांत मात्र या कामांवर संघटना माध्यमातून सामूहिक बहिष्कार टाकण्यात आला आहे.(वार्ताहर)
सेल्फी सक्तीने शिक्षकवर्ग संतप्त
By admin | Published: January 09, 2017 2:45 AM