लोणी काळभोर : जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता असल्याने शाळा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. अशी परिस्थिती असताना मात्र हवेली पंचायत समिती शिक्षण विभागात एक शिक्षकच लिपिकाचे काम करीत असल्याने हवेली पंचायत समितीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.जिल्ह्यातील विद्यमान आमदाराच्या खासगी स्वीय सहायकास याचा नुकताच अनुभव आला. आमदाराचे पीए पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात गेले असता त्यांना हा प्रकार समजला. शिवणे (ता. हवेली) येथील शाळेतील एक शिक्षक पंचायत समितीत शिक्षण विभागात लिपिकाचे काम पार पाडत आहेत. एकीकडे हवेली तालुक्यात ५४ उपशिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे अनेक वर्गांना शिक्षकच उपलब्ध नाहीत. त्यातच शिवणे येथील शाळेतील शिक्षक प्रत्यक्ष तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण विभागात लिपिक म्हणून कार्यरत असल्याने या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे. उपलब्ध माहितीनुसार संबंधित शिक्षक अनेक वर्षे शिवणे येथील शाळेत न जाता तालुका कार्यालयाच्या ठिकाणी लिपिकाचे काम करीत आहे. त्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध असल्यामुळे त्याबाबत कोणीही शिक्षक तक्रार करण्यास धजावत नसल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात जवळपास ८५० शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. सर्व शाळांना शिक्षक उपलब्ध नसल्याने हवेली तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतेक शाळांमध्ये शिक्षकांना अतिरिक्त जबाबदारी पार पाडावी लागत आहे. दोन वर्षांपासून शिक्षकपदांची भरती न झाल्याने जिल्ह्यात जवळपास ११५ मुख्याध्यापकपदे, ८२५ उपशिक्षक, तर २२५ पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
शिक्षकच करतोय लिपिकाची कामे
By admin | Published: December 24, 2016 12:11 AM