- प्रकाश गायकर पिंपरी : महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षक विविध प्रयत्न करताना दिसत आहेत. अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण होऊन त्यांना सुलभ पद्धतीने शिक्षण घेता यावे यासाठी चºहोली पठारे मळा शाळेतील शिक्षकांनी एक अनोखा उपक्रम राबविला आहे. शाळेतील सर्व भिंतींवर विविध विषयांवर आधारित चित्रे रेखाटली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास मदत झाली आहे.चºहोली-पठारेमळा या ठिकाणी पूर्वी शाळेची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती. शाळेच्या इमारतीच्या भिंतींना तडे गेले होते. त्यामधून पावसाचे पाणी झिरपून वर्गामध्ये येत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे या शाळेतील पटसंख्याही कमी झाली होती. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींची दखल घेऊन शिक्षकांनी शाळेचे रूप पालटण्याचे ठरवले. शिक्षक अमोल भालेकर व विवेक रासकर यांनी शाळेच्या काळवंडलेल्या भिंतींना बोलके केले. या शिक्षकांनी शाळेतील भिंतींवर विविध रंगांमध्ये चित्रे काढली. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उपयुक्त होईल, असे पाठ भिंतीवर रंगवून विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केले. महापालिकेने शिक्षकांची ही धडपड बघून गळके छत व खिडक्या बदलल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारी माहिती रेखाटल्याने भिंती जणू विद्यार्थ्यांशी बोलू लागल्या आहेत.विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी भिंतीवर सप्तरंगी इंद्रधनुष्य, तारांगण, चंद्र, सूर्य, आकाशमाला रेखाटली आहे. तसेच मराठी बाराखडी, मराठी-इंग्रजी महिने, व्याकरण, दिशाज्ञान, गणितीय सापशिडी, बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार या गणितीक्रिया करण्यासाठी सूत्रे, वाक्प्रचार गिरविण्यात आले आहेत. पर्यावरणीय माहितीसाठी विविध प्रकारची झाडे, भौगोलिक माहिती, महाराष्ट्र व भारताचा नकाशा, विज्ञान, निसर्गविषयक माहिती, प्राणी-पक्ष्यांची चित्रे काढण्यात आली आहेत. या ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना सांस्कृतिक व संगीत कलेची माहिती व्हावी या उद्देशाने तबला, पेटी, ढोलकी, वीणा, सारंगी यांसारखी संगीतवाद्ये रंगवली आहेत. त्यामुळे या शाळेबद्दल कुतुहूल वाटत आहे.काही दिवसांपूर्वी शाळेची परिस्थिती अत्यंत वाईट होती. विद्यार्थ्यांना शिकविताना अनेक गैरसोर्इंचा सामना करावा लागत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्याही दिवसेंदिवस घटत होती. मुलांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी आम्ही शिक्षकांनी मिळून भिंतीवर आकर्षक चित्रे रंगवली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडून मुलांचा शाळेकडे कल वाढला. लोकसहभागातून शाळेची डिजिटल शाळेकडे वाटचाल सुरू आहे.- अमोल भालेकर, शिक्षक
बोलक्या भिंती उपक्रमातून चिमुकल्यांना शिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 5:05 AM