पिंपरी : महापालिकेतील शिक्षण मंडळ बरखास्त करून सव्वा वर्ष झाल्यानंतर नवीन समिती स्थापन झाली. त्यात महिलांची संख्या अधिक असून, आठ नगरसेवकांचा समावेश या समितीत आहे. भाजपाच्या प्रा. सोनाली गव्हाणे, सुवर्णा बुर्डे, शर्मिला बाबर, शारदा सोनवणे, संगीता भोंडवे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विनया तापकीर, राजू बनसोडे, उषा काळे आणि शिवसेनेकडून अश्विनी चिंचवडे यांची निवड केली आहे. महापौर नितीन काळजे यांनी निवड झाल्याचे जाहीर केले. आता सभापती कोण होणार? याबाबत उत्सुकता आहे. सभापती भोसरीचा होणार असल्याची चर्चा आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित असणाऱ्या शिक्षण मंडळातील कथित गैरव्यवहाराची प्रकरणे समोर आल्यानंतर शिक्षण मंडळे बरखास्त करावीत, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे महापालिका सभागृह अस्तित्वात असेपर्यंत म्हणजेच फेब्रुवारी २०१७ पर्यंत शिक्षण मंडळ स्वतंत्र अस्तित्वात ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीत झाली. त्यानंतर बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार शिक्षण मंडळाचे अस्तित्व संपुष्टात आले. महापालिका आयुक्तांनी शिक्षण मंडळ गेल्या वर्षी जून महिन्यात शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचे आदेश काढले. त्यांच्या अधिपत्याखालील मालमत्ता, कर्मचारवृंद स्वत:च्या अधिकार कक्षेत घेतले. सर्व अधिकार संपुष्टात आणले गेले. त्यानंतर शिक्षण समितीची स्थापन केली आहे. त्यामध्ये संख्याबळानुसार नगरसेवकांना संधी दिली आहे. या समितीवर मंडळाप्रमाणे पंधराऐवजी विषय समितीप्रमाणे नऊ नगरसेवकांची समिती निर्माण झाली आहे. त्यानुसार भाजपच्या सोनाली गव्हाणे, सुवर्णा बुर्डे, शर्मिला बाबर, शारदा सोनवणे, संगीता भोंडवे हे पाच नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे विनया तापकीर, राजू बनसोडे, उषा काळे तीन नगरसेवक आणि शिवसेनेच्या संख्याबळानुसार अश्विनी चिंचवडे यांची समितीत निवड केली आहे. महापौरांनी या नगरसेवकांची समितीत निवड झाल्याचे घोषित केले.>सदस्य निवडीनंतर आता सभापती कोण होणार याबाबत चर्चा रंगली आहे. शिक्षण मंडळाचा सभापती हा उच्चशिक्षित असावा, शिक्षण विषयाची जाण असावी, असे धोरण भाजपाचे आहे. त्यामुळे पहिला सभापती होण्याची संधी आमदार महेश लांडगे गटाच्या प्रा. सोनाली गव्हाणे यांना मिळणार असल्याचे वृत्त आहे.
सव्वा वर्षाने शिक्षण समिती, सभापतिपदी सोनाली गव्हाणे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 1:56 AM