प्रतिष्ठेच्या मावळ लढतीस बड्या नेत्यांची फौज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 01:58 PM2019-04-25T13:58:23+5:302019-04-25T14:20:50+5:30
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ हा महाआघाडीकडून रिंगणात असून, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची लढत प्रतिष्ठेची झाली आहे.
हणमंत पाटील
पिंपरी : राज्यातील चौथ्या टप्प्यात मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ हा महाआघाडीकडून रिंगणात असून, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची लढत प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे या लढतीसाठी दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यभरातून शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची फौज २९ एप्रिलपर्यंत मावळात तळ ठोकणार आहे.
पहिल्या टप्प्यात विदर्भ, दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा अन् तिसऱ्या टप्प्यातील पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुका २३ एप्रिलला संपल्या आहेत. त्यामुळे चौथ्या टप्प्यातील उत्तर महाराष्ट्र व मुंबई परिसरातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर वाढला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेत मावळसाठी पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे ही निवडणूक पवार कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्याच्या प्रचारासाठी अजित पवार, सुनेत्रा पवार, भाऊ जय आणि चुलतभाऊ रोहित पवार असे संपूर्ण कुटुंब मावळात तळ ठोकून आहे. बारामतीचा प्रचार संपल्यामुळे शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे याही मावळात दाखल होणार आहेत.
महायुतीकडून हॅट्ट्रिकची तयारी
पवार कुटुंबीयाप्रमाणे बारणे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढत आहे. त्यामुळे बारणे यांचे संपूर्ण कुटुंब प्रचारात उतरले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, पालकमंत्री गिरीश बापट, युवा नेते आदित्य ठाकरे, रामदास कदम, डॉ. नीलम गोऱ्हे , नितीन बानगुडे पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, बाळा भेगडे, गौतम चाबुकस्वार, प्रशांत ठाकूर व सुरेश लाड अशी भाजपा व शिवसेना नेत्यांची फौज बारणे यांच्या प्रचारासाठी मावळात उतरली आहे. मावळ मतदारसंघात हॅट्रीक करण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी मित्रपक्ष असलेला भाजपा व रिपब्लिकन पक्षाचे स्थानिक नेते व कार्यकर्तेही प्रचारात उतरले आहेत. त्यांच्या मदतीसाठी पुण्यातील भाजपा व शिवसेनेचे नेते व नगरसेवक पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाले आहेत.
.............
राष्ट्रवादीत कार्यकर्त्यांपेक्षा नेते उदंड
४महाआघाडीची उमेदवारी पार्थ अजित पवार यांना असल्याने नेत्यांची प्रतिष्ठा जाऊ नये म्हणून पुणे व पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक नेते कामाला लागले आहेत. परंतु, कार्यकर्त्यांची कमतरता महाआघाडीच्या प्रचारात दिसून येत आहे. नेते उदंड झाले, कार्यकर्ते सापडेनात अशी स्थिती राष्ट्रवादीची झाली आहे. शिवाय अजित पवार यांच्यावरील प्रेम दाखविण्यासाठी राज्यभरातून राष्ट्रवादीचे नेते मावळ मतदारसंघात दाखल झाले आहेत. त्यामध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री भास्कर जाधव, हर्षवर्धन पाटील, खासदार उदयनराजे भोसले, आमदार दिलीप सोपल, राहुल मोटे असे नेते तळ ठोकून आहेत.