पिंपरी : चिंचवड येथील क्वीन्सटाऊन सोसायटीतील मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या १० तासांत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मुलीची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश मिळाले. गुन्हे शाखा युनिट एक आणि दोन, तसेच खंडणी व दरोडा प्रतिबंधक आणि स्थानिक पोलीस यांनी एकत्रित येऊन केलेल्या सांघिक कामगिरीमुळे पोलिसांनी यशस्वी कामगिरी केली, असे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी सांगितले. आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथक, खंडणी व दरोडाविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, युनिट एकचे पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, युनिट दोनचे सुधाकर काटे, पोलीस निरीक्षक पोळ, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, सतीश माने, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, तसेच अजय भोसले, महेश खांडे, राजेंद्र शिंदे, संतोष बर्गे, किरण लांडगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. सात लाख रुपये आणि दागिने दिल्यास मुलीला सोडून देऊ असे अपहरणकर्त्यांनी सांगितले. हात-पाय बांधून, तोंडावर चिकटपट्टी लावून मुलीला खोलीत डांबून ठेवले होते. एकजण बाहेर येऊन मोबाइलवर संपर्क साधत असे. तो पोलिसांना दिसून आला. त्याला ताब्यात घेऊन सदनिकेचा दरवाजा उघडला असता, दुसरा आरोपीसुद्धा पोलिसांच्या हाती लागला. मध्यरात्री एकच्या सुमारास ही मोहीम यशस्वी झाली.आयुक्त पद्मनाभन म्हणाले, ‘‘चाकणला मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने एकीकडे बंदोबस्ताची तयारी सुरू होती, अशातच अपहरणाचा संवेदनशील विषय असल्याने त्यास प्राधान्य दिले. मुलीच्या वडिलांना बरोबर घेऊन पोलीस पथकाने अपहरणकर्त्यांचा माग काढला. मारुंजीजवळील एक्झर्बिया सोसायटीत मुलीला ठेवले असल्याचे तपास यंत्रणेच्या निदर्शनास आले. पोलीस पथक तेथे पोहोचले. अपहरणकर्त्यांची मोटार तेथे दिसून आली. सोसायटीच्या चोहोबाजूंनी पोलीस तैनात केले. तेथील विंग ए सदनिका ६१० मध्ये मुलीला ठेवले असल्याचे समजले. अपहरणकर्ते खंडणीबाबत तिच्या वडिलांशी संवाद साधत होते.