पिंपरी : नदीपात्रात होत असलेल्या अनधिकृत उत्खननावर कारवाई करण्यात आली. त्यासाठी पिंपरी -चिंचवडच्या तहशीलदार गीता गायकवाड यांनी डंपरमधून प्रवास करत नदी पात्रात गेले. देहू येथे इंद्रायणी नदी पात्रात शनिवारी (दि. २४) पहाटे तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. तहसीलदारांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.
इंद्रायणी नदी पात्रातून वाळूचे अवैध उत्खनन होत असल्याची माहिती पिंपरी -चिंचवडच्या अपर तहसीलदार गीता गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई केली. मात्र या कारवाईमध्ये वाळू तस्करांना चाहूल लागल्यास ते पसार होतील म्हणून खबरदारी घेण्यात आली. त्यासाठी शासकीय वाहनाचा वापर टाळण्यात आला. त्यानुसार तहसीलदार गीता गायकवाड, निवासी नायब तहसीलदार प्रवीण ढमाले तसेच त्यांच्या पथकाने शासकीय वाहनाऐवजी निगडीतील तहसीलदार कार्यालय येथून डंपरमधून देहूकडे रवाना झाले.
वाळू उत्खनन करून वाहतुकीसाठी डंपरचा वापर करण्यात येत होता. त्यामुळे शासकीय वाहनातून तहसीलदार आणि त्यांचे पथक गेले असते तर तस्करांना त्यांची चाहूल लागली असती. मात्र तहसीलदार व पथक डंपरमधून नदीपात्रात गेले. त्यामुळे वाळूचे उत्खनन करणाऱ्यांना पथकाची चाहूल लागली नाही. पहाटे तीनच्या सुमारास अंधारात नदीपात्रात वाळू उत्खनन होत असलेल्या ठिकाणी डंपरमधून तहसीलदार व पथक पोहचले आणि कारवाई केली.
कारवाई मध्ये तीन ट्रॅक्टर आणि दोन पोकलेन जप्त करण्यात आले. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
तहसीलदार गीता गायकवाड, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, मंडल अधिकारी शेखर शिंदे, तलाठी बाळकृष्ण साळुंके.श, तलाठी सूर्यकांत काळे, अतुल गीते, महसूल सहाय्यक उन्मेश मुळे, पोलीस पाटील महेश गायकवाड, चंद्रसेन टिळेकर व सुहास चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.