पिंपरी : महापालिकेने कोरोना परिस्थितीची जाणीव असतानाही गणेश विसर्जनाची कोणतीही सोय केली नाही. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात शिवसेनेने आज (सोमवारी) महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. विसर्जन घाट व पूर्वीचे महापालिकेने बांधलेले विसर्जन हौद बंद केले. शहरात फिरत्या हौदांची कोठेही व्यवस्था केली नाही, मूर्तिदान उपक्रमाचे ढिसाळ नियोजनामुळे सांगा गणपतीचे विसर्जन कुठे करायचं,असा सवाल शिवसेनेच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी केला.
शिवसेनेच्या आंदोलनानंतर संध्याकाळपर्यंत मुर्तीदानाबाबत प्रभागनिहाय नियोजन करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले. जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, महिला संघटिका उर्मिला काळभोर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, विश्वजित बारणे, सरिता साने, अजित तुतारे, संतोष सौंदणकर, बाळासाहेब वाल्हेकर आदी आंदोलनात सहभागी झाले.
शहरातील दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना नागरिकांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे शिवसेनेने दान घेतलेल्या मुर्ती विसर्जनासाठी प्रशासनाकडे आज आंदोलनाद्वारे सुपूर्द केल्या आहेत, असे गजानन चिंचवडे यांनी सांगितले.----------------महापालिकेने मुर्ती विसर्जनासाठी शहरात कोणत्याही प्रकारची सोय केलेली नाही. शेजारील पुणे पालिकेने विसर्जनासाठी फिरते हौद केले आहेत. मुर्तीदान उपक्रम राबविला जात आहे. पण, पिंपरी पालिकेने कोणतीही व्यवस्था केली नाही. महापालिका प्रशासन केवळ निविदा प्रक्रियेत गुंतले आहे. कोरोना परिस्थितीची जाणीव असतानाही या अधिका-यांचा नियोजनशून्य कारभार आहे. गणेशभक्तांच्या भावनांशी न खेळता तातडीने प्रभागनिहाय मुर्ती विसर्जनाचे नियोजन करावे. - श्रीरंग बारणे, खासदार,शिवसेना-------------------