भोसरी : थंडी आता काढता पाय घेण्याच्या तयारीत असून उन्हाची तीव्रता वाढत आहे. पारा ३५ अंश सेल्सियसपर्यंत पोहचत आहे. शाळांमध्ये परीक्षांना सुरुवात आणि पानगळीने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.पावसाच्या दमदार हजेरीमुळे यंदा शहरवासीयांना कडाक्याची थंडी अनुभवायला मिळाली. नेहमीपेक्षा लवकरच थंडीचे आगमन झाले. गेले १५ दिवस तापमानात चढ-उतार सुरू होता. दोन दिवसांपासून उकाडा जाणवू लागला आहे. पारा किमान १५ तर कमाल ३५ अंशांपर्यंत स्थिरावल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळी साडेसहालाच सूर्यदर्शन होत आहे.आठपासूनच ऊन जाणवत आहे. निसर्गचक्रानुसार होळीनंतर थंडी गायब होते, असे जुने-जाणते सांगतात. होळी आठ दिवसांवर येऊन ठेपली असतानाथंडीनेही काढता पाय घ्यायला सुरुवात केल्याचे अनुभवायला मिळत आहे.दरम्यान, उन्हाळ्याची चाहूल लागल्याने शहरातील बाजारपेठांमधील चित्रही बदलू लागले आहे. पिंपरी, चिंचवड, निगडी, आकुर्डी, भोसरी, चिखली, निगडी, रावेत, वाकड, पिंपळे सौदागर आदी ठिकाणच्या बाजारपेठेत एसी, कुलर, फ्रिज, पंखे विक्रीसाठी अग्रस्थानी दिसत आहेत. रस्तोरस्ती दिसणाºया स्वेटर, कानटोप्यांची जागा आता सनकोट, स्कार्फ, टोप्या, उन्हाळी शर्टने घेतली आहे. जागोजागी उसाच्या रसाचे गुºहाळ सुरू झाले आहे. रस्त्यालगत सरबत विक्रेत्यांनी स्टॉल थाटले आहेत. आइस्क्रीम विक्रेत्यांकडील गर्दी वाढत आहे. गरिबांचा फ्रिज म्हणून ओळखले जाणारे माठ हातगाड्यांवर दारोदारी विक्रीसाठी येत आहेत.उद्योगनगरीत रानमेवा दाखलउन्हाळ्याची चाहूल लागताच शहरात उन्हाळी रानमेवा दाखल होऊ लागला आहे. कलिंगड, टरबूज, द्राक्षांनी फळबाजार व्यापला आहे. हिवाळ्यात एक रुपयाला एक या दराने विक्री होणारा लिंबू आता भाव खाऊ लागला आहे. दोन रुपयांना एक या दराने सध्या लिंबूची विक्री सुरू आहे. संत्री, मोसंबीसह अंजीर, स्ट्रॉबेरी, चिकू, पपई, पेरु ही फळेदेखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. चिंचा, कैरीची पिंपरी व मोशी उपबाजारात आवक सुरू झाली आहे. मात्र, हंगामाची सुरुवात असल्याने त्याचे दर चढे असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
तापमानात वाढ : थंडीने घेतला काढता पाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 1:57 AM