पिंपरी : प्राधिकरणातील गंगानगर सेक्टर २८ येथे राजस्थानी पद्धतीचे संगमरवरी कोरीव काम असलेले श्री गणेश मंदिर साकारले आहे. शिवतेज मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे. कार्यकर्त्यांची इच्छाशक्ती व राजस्थानी कारागिरांचे कलाकौशल्य यांमुळे वास्तुकलेचा एक उत्तम नमुना शहरवासीयांना पाहावयास मिळणार आहे. गंगानगरात मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून १९९०मध्ये गणेश मंदिर उभारले होते. मंदिरात पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती असलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यास सुमारे १२ लाखांची आभूषणे तयार केली होती. सुमारे २५ वर्षे जुने हे मंदिर मोडकळीस आल्याने जीर्णोद्धार करण्याचे कार्यकर्त्यांनी निश्चित केले. त्यासाठी अध्यक्ष रमेश पेडणेकर, कार्याध्यक्ष रणजित इंगळे, उपाध्यक्ष शीतल पवार यांनी पुढाकार घेतला. तसेच, राजस्थानी पद्धतीने संगमरवरी कोरीव काम असलेले श्रींचे मंदिर उभारण्याचे ठरविले. राजस्थानातून आणलेले संगमरवरी पूर्ण दगड आणले. सात ते आठ कलावंत त्या दगडांना आकार आहेत. कोरीव घडाई करून त्या दगडांचे मंदिर पूर्ण झाले आहे. सुमारे ४० लाख रुपये खर्च आला आहे. मंदिर उभारणीसाठी दीपक पाटील, मनमोहनसिंग बिलखू, श्याम बऱ्हाटे, हसमुख राठोड, सचिन पांढारकर, सचिन परभाणे, विनोद साळगावकर, नेताजी आगलावे, सुनील आहेर, रवी कांबळे, राजेश तेलावडे, जसवीरसिंग बिलखू, सरवनसिंग बिलखू, विशाल गाडेकर यांनी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)
राजस्थानी शैलीत मंदिर
By admin | Published: September 02, 2015 4:13 AM