रावेत : वाल्हेकरवाडीमधील रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यामुळे आता पावसामुळे पडलेले खड्डे मुरूम टाकून तात्पुरते बुजवण्यात येत आहेत.मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरासह उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली. त्याामुळे नागरिकांना दिलासाही मिळाला. पण यामुळे दुसरीकडे मात्र रस्त्यांवर खड्ड्यांचा विषय पुन्हा डोके वर काढत आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांनाही जीव मुठीत धरून गाडी चालवावी लागत आहे. शहराच्या अंतर्गत भागांमध्ये रस्त्यांच्या समस्या नागरिकांना नेहमीच भेडसावणारा प्रश्न आहे.या रस्त्याची अवस्था अत्यंत विदारक झाली आहे. रस्त्याची चाळण झाल्याने वाहतूककोंडीत अधिकच भर पडत आहे. रावेत, रावेतगाव, शिंदे वस्ती, जाधव वस्ती, गुरुद्वारा चौक, चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी, गावठाण परिसर आदी भागांमध्ये अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.पावसाची रिमझिम चालू असतानाच ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून खड्ड्यांची तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम सुरू आहे. परंतु परत पाऊस आला की हेच खड्डे पूर्ववत स्थितीत येतात़ पाऊस पडण्याआधी रस्त्याची डागडुजी करणे महत्त्वाचे असूनही खड्डे पडल्यानंतर महापालिकेला ते मुरूम टाकून बुजवण्याची जाग येते. यावरूनच रस्त्यांच्या प्रश्नांबाबत महापालिकांचे दुर्लक्ष होत आहे, असेच म्हणावे लागेल. रस्त्यांचे डांबरीकरण वेळेत होणे अपेक्षित होते. परंतु खड्ड्यांमुळे रस्त्याचेच विद्रूपीकरण होत आहे. डागडुजीसाठी एवढा निधी मंजूर होऊन काम काहीच दिसत नसल्याने निधी नेमका कुणाच्या खिशात गेला याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. या खड्ड्यांमुळे अनेक वाहने अडकून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे मुरूम टाकून या खड्ड्याचे काम न करता यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी नागरिकांची मागणी आहे़
रस्त्यावरील खड्ड्यांना तात्पुरती मलमपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:44 AM