लोणावळा - जमिनीच्या वादातून पवनानगर (ता.मावळ) येथे सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने दहा गाड्याची तोडफोड केली आहे. तसेच परिसरातील घरांवर देखील दगडफेक करण्यात आली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात मारहाणीचा तसेच सार्वजनिक शांतता भंग केल्याचा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पवनाधरणाच्या पायथ्याला असलेल्या ब्राम्हणोली गावातील शांताराम काळे यांची पाच एकर वडलोपार्जित जमीन आहे. पवनाधरणाच्या बांधकामावेळी यापैकी काही जमीन ही धरणात गेली व उर्वरित जागेवर काळे हे भातशेती तसेच गहू व भाजीपाल्याचे पीक घेतात. याच शेतीच्या समोरुन वाहणार्या पवनानदीच्या काठावर गावातील काही मंडळींनी अनाधिकृतपणे टेंन्ट लावत कॅम्प साईड तयार केली आहे. मात्र या कॅम्पसाईडकडे जाणचयास रस्ता नसल्याने शांताराम काळे यांच्या भातशेतीमधून रस्ता बनविण्यात आला आहे. सदरच्या रस्त्याला काळे यांनी विरोध केला असता ही जागा पाटबंधारे विभागाची असल्याने तुमची परवानगी घेण्याची गरज नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देत पाटबंधारे विभागाच्या सोबत करण्यात आलेला भाडेकरार त्यांना दाखविण्यात आला.
शांताराम काळे यांनी याबाबत पाटबंधारे विभाग तसेच तहसिलदार, पोलीस प्रशासन यांच्यासह मिडियाकडे दाद मागायला सुरुवात केल्याचा राग मनात धरुन हनुमंत काळे, बाबु काळे, अनिकेत काळे, सागर काळे, संदीप ठोंबर, अक्षय काळे यांच्यासह इतर 15 ते 20 जणांच्या टोळक्यांनी शांताराम काळे व त्यांचे कुठुंबिय यांच्यावर हल्ला चढविला. यावेळी गावात शेजारी किर्तन सुरू असल्याने अनेक वाहने उभी होती. त्या वाहनांची देखील मोडतोड करण्यात आली. या हल्ल्यात वंदना काळे व वंदना मोहोळ या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपींचा शोध सुरू आहे.