पिंपरी: शहरातील अनेक उच्चभ्रू सोसायटीत भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत चालली आहे. गुरूवारी भटक्या कुत्र्यांने दहा वर्षाच्या मुलांवर हल्ला केला. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने लहान मुले, महिला, वृद्ध यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गुरूवारी आकुर्डी स्टेशन परिसरातील गुरूव्दारा चौकानजीक दर्शन पाटील (वय १०) हा घरी पायी जात होता. त्यावेळी त्याच्यावर भटक्या कुत्र्याने अचानक त्याच्यावर हल्ला करत दोन्ही पाय आणि हाताला चावा घेतला. त्याच्यावर खासगी रुग्णालयातून उपचार करून इंजेक्शन देण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात नागरिक घाबरले असून कारवाईची मागणी करण्यात येत आहे. अनेक वेळा कुत्र्यांच्या दहशतीची घटना सीसीटीव्हीतही चित्रित झालेली असते. त्यामुळे सोसायटी परिसरात भटक्या कुत्र्यांबाबत दरमहा ४० ते ५० तक्रारी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून प्राप्त होऊ लागल्या आहेत.
श्वानप्रेमींमुळे कुत्र्यांच्या खाण्याची सोय...
सोसायटीत श्वानप्रेमी राहतात. ते श्वानांचे पालन-पोषण करत असतात. अनेक श्वानप्रेमी रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना सोसायटीत नेऊन खाऊ-पिऊ घालत असतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या खाण्याची व राहण्याची सोय होते. त्यामुळे ही कुत्री त्याच सोसायटीत वास्तव्य करण्यास सुरुवात करतात. ते सोसायटी सोडून बाहेर जातच नाहीत. यामुळे सोसायटी परिसरात, पार्किंग एरियात लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांवर कुत्र्यांच्या हल्ल्याची शक्यता वाढली आहे.
माझा मुलगा दुपारी क्लासवरून घरी येत होता. त्यावेळी त्याच्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू केले आहेत. घडलेल्या प्रकारामुळे तो अत्यंत भयभीत झाला आहे. - हरीश पाटील, पालक
भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. भटक्या कुत्र्यांची निर्माण झालेली भीती कमी होण्यासाठी आम्ही सतत जनजागृती करत असतो. भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणारे श्वानप्रेमी व नागरिकांची भिती याबद्दल समुपदेशन करण्यात येते. -संदीप खोत, उपायुक्त, पशु वैद्यकीय विभाग, महापालिका