पुणे : टीईटी पेपर गैरव्यवहारात जी ए सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याच्याबरोबर अटक करण्यात आलेल्या दोघा मुख्य एजंटांना ३५० परीक्षार्थींचे ३ कोटी ८५ लाख रुपये देणाऱ्या दोघा शासकीय कर्मचाऱ्यांना सायबर पोलिसांनी नाशिकहून अटक केली आहे. टीईटी गुन्ह्यात १२ जणांना अटक केली असून तब्बल ४ कोटी ६८ लाख रुपयांचा माल हस्तगत केला आहे. सुरंजित गुलाब पाटील (वय ५०, रा. उत्तरानगर, नाशिक), स्वप्नील तीरसिंग पाटील (रा. शिक्षक कॉलनी, चाळीसगाव, जळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात सांगितले की, स्वप्नील पाटील शिक्षक असून सुरंजित पाटील टेक्निशियन आहे. त्यांनी टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात अंकुश हरकळ व संतोष हरकळ यांच्यांशी संपर्क करुन २०१८ /२०१९ या परीक्षेसाठी बसलेल्या परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी कट रचला. सुरंजित पाटील याने २०१९ च्या परीक्षेसाठी २०० परीक्षार्थीकडून प्रत्येकी १ लाख १० हजार रुपये घेऊन या परीक्षार्थीची यादी व २ कोटी ३५ लाख रुपये अंकुश व संतोष हरकळ यांच्याकडे वेळोवेळी दिल्याचे कबुल केले आहे.
स्वप्नील पाटील याने २०१९ च्या परीक्षेला बसलेल्या १५० परीक्षार्थींकडून प्रत्येकी १ लाख १० हजार रुपये घेऊन त्यांची यादी व १ कोटी ५० लाख रुपये इतकी रक्कम अंकुश व संतोष हरकळ यांना दिली आहे. त्यांना या परीक्षा गैरव्यवहारात किती रक्कम प्राप्त झाली याबाबत तपास करायचा आहे, असे न्यायालयात सांगितले. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी, अनिल डफळ, सचिन वाजे, नितेश शेलार, रवींद्र साळवे, नितिन चांदणे, सोनुने, अश्विन कुमकर यांनी केली आहे.
प्रीतीश देशमुखने ३ वेळा बदलला निकालडाॅ. प्रीतीश देशमुख याने अंकुश व संतोष हरकळ यांच्याकडून परीक्षार्थींची जमवाजमव करुन त्यांच्याकडून पैसे घेऊन अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी शिक्षण परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर २ ते ३ वेळा बनावट निकाल प्रकाशित केला.