मंगेश पांडे, पिंपरीशिधापत्रिकेतील लाभार्थ्यांच्या सर्व माहितीचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. मात्र, ती सादर करण्यास परिमंडल कार्यालय ‘अ’मधील शिधापत्रिकाधारकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. १ लाख ७९ हजार १६४ शिधापत्रिकाधारकांपैकी गेल्या महिनाभरात अवघ्या २२ हजार शिधापत्रिकाधारकांनी माहिती सादर केली आहे. या कार्यालयांतर्गत देहूरोड, निगडी, चिंचवड, खराळवाडी आणि पिंपरी असे पाच विभाग येतात. शिधापत्रिकांची एकूण संख्या १ लाख ७९ हजार १६४ इतकी असून, नागरिकांची संख्या १८ लाख २४ हजार ३१३ आहे. शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांच्या माहितीचे संगणकीकरण करण्यासाठी महिनाभरापासून माहिती संकलित करण्याचे कामकाज सुरू आहे. त्यासाठीचे अर्ज स्वस्त धान्य दुकानदारांकडे उपलब्ध आहेत. या कार्यालयांतर्गत २५२ स्वस्त धान्य दुकानदार आहेत. त्यांच्याकडे अर्जासह शिधापत्रिकेची झेरॉक्स, घरगुती गॅस कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स यासह कुटुंबातील स्त्रीचे दोन फोटो जमा करावयाचे आहेत. शुभ्र आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य, तसेच इतर लाभ मिळत नसल्याने या शिधापत्रिकाधारकांकडून कागदपत्रे सादर करण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. या तुलनेत पिवळे, अंत्योदय आणि अन्नपूर्णा या शिधापत्रिकाधारकांकडून अधिक प्रमाणात माहितीचा अर्ज सादर केला जात आहे. माहितीचे अधिकाधिक अर्ज जमा व्हावेत यासाठी कार्यालयाकडून वेगवेगळ्या माध्यमातून आवाहनही केली जात आहे. माहितीचे संगणकीकरण झाल्यानंतर कागदी शिधापत्रिकांचे स्मार्ट कार्ड होणार आहे. लाभार्थ्यांचे आधार क्रमांक शिधापत्रिकांशी जोडले जाणार आहेत. यामुळे बनावट कार्ड निघण्यास आळा बसणार आहे. उन्हाळी सुटीनिमित्त कुटुंब बाहेरगावी गेली आहेत. त्यामुळे अनेकांची कागदपत्रे जमा झाली नाहीत. त्यामुळे १५ जूनपर्यंतही कागदपत्रे जमा करता येऊ शकतात, असे परिमंडळ कार्यालयातून सांगण्यात आले.
माहितीच्या ‘रेशन’कडे पाठ
By admin | Published: June 09, 2015 5:43 AM