पिंपरी : सायंकाळी साडेपाच ते पावणेसहाच्या सुमारास इतर मुलांसोबत खेळत असलेल्या सात वर्षीय मुलीसमोर सराईत गुन्हेगाराने आरडाओरडा करत पाच गोळ्या हवेत झाडल्या. मद्यधुंद असलेल्या या सराईताने यावेळी दहशत निर्माण केली. गोळीबाराच्या आवाजाने नागरिक भयभीत झाले. तसेच सात वर्षीय मुलीच्या आईने धाव घेत मुलीला जवळ केले. तरीही सराईताकडून गोंधळ सुरूच होता. या प्रकाराने नागरिक भयभीत झाले.
पत्राशेड, चिंचवड येथे मंगळवारी (दि. ६) सायंकाळी ही घटना घडली. याबाबत प्रत्यक्षदर्शी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, महिलेची सात वर्षीय मुलगी इतर मुलांसोबत पत्राशेड येथे घराजवळ असलेल्या लोहमार्गालगतच्या मोकळ्या जागेत खेळत होती. त्यावेळी एक सराईत गुन्हेगार त्याच्या साथीदारांसह रिक्षातून तेथे आला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या सराईताच्या हातात पिस्तूल होते. मुलगी खेळत असलेल्या ठिकाणी येऊन सराईताने आरडाओरडा केला. तसेच मुलीकडे पाहून त्याने हवेत गोळीबार केला. ठा... ठा... असा त्याचा आवाज झाला. इतक्या जवळून गोळीबार झाल्याने मुलगी सुन्न झाली. तसेच सर्व नागरिक घाबरले. महिला आणि ज्येष्ठ नागरिक घरांतून बाहेर आले. नेमके काय झाले, हे कोणालाच काही कळले नाही. सराईताच्या हातात खेळण्यातील बंदूक आहे, असे वाटले. त्यानंतर पुन्हा सराईताने आरडाओरडा व शिवीगाळ करत हवेत गोळी झाडली.
सराईताचा रात्री-अपरात्रीही गोंधळ
पत्राशेड येथे दशहत निर्माण करण्यासाठी सराईत गुन्हेगाराने गोळीबार केला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच या सराईत गुन्हेगाराने यापूर्वीही पत्राशेड येथे रात्री-अपरात्री येऊन गोंधळ घातल्याचे प्रकार घडले आहेत. नशेत येऊन शिवीगाळ करून स्थानिक नागरिकांना धमकावण्याचे प्रकार त्याच्याकडून होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
‘आमच्या जिवाला धोका’
गोळीबाराची घटना घडल्यानंतर सायंकाळी पोलिसांचा मोठा ताफा पत्राशेड येथे आला होता. मात्र, रात्री एकही पोलिस तेथे नव्हता. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात आली. सराईत गुन्हेगारांकडून धमकावण्यात आल्याने आम्हाला भीती वाटत आहे. आमच्या जिवाला धोका आहे, असेही स्थानिकांनी सांगितले.
कानात फुंकर मारून तिला कवटाळले
मुलीकडे पाहून सराईताने हवेत गोळीबार केला. त्यामुळे माझा थरकाप उडाला. त्याच्या हातात खेळण्याची नव्हे तर खरोखरची पिस्तूल असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मी धावत जाऊन मुलीला जवळ घेतले. मुलगी एकदम घाबरली. कानात फुंकर मारून तिला कवटाळले. त्यानंतरही सराईताने हवेत गोळीबार केला. - प्रत्यक्षदर्शी महिला, पत्राशेड, चिंचवड