पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. २७ जानेवारीपासून ३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. प्रमुख पक्ष वगळता अन्य छोट्या पक्षांतील निवडणूक लढण्याची हौस असणाऱ्या उमेदवारांना आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी कोणावर तरी अवलंबून राहावे लागते आहे. अशा उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची सुविधा असलेली दुकाने थाटण्यात आली आहेत. नवख्या आणि संगणक निरक्षर उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी हजार रुपये मोजावे लागत आहेत. निवडणुकीचा काळ अनेक अंगांनी सुगीचा काळ मानला जातो. निवडणूक काळात पैसे कमावण्यासाठी नाना युक्त्या अवलंबल्या जातात. कोणी प्रचार पत्रके छापून देण्यासाठी, कोणी वाटपासाठी पुढे येतात. तर काही जण कार्यकर्त्यांच्या पार्ट्यांच्या आयोजनासाठी पुढाकार घेतात. कोणत्या ना कोणत्या मार्गाने इलेक्शन एनकॅश करण्याचा प्रयत्न होत असतो. अशाच पद्धतीचा प्रयत्न एका कार्यकर्त्याने केला आहे. नवख्या आणि संगणक निरक्षर लोकांची गरज लक्षात घेऊन त्याने निवडणुकीसाठी सर्व काही मदत एकाच छताखाली उपलब्ध करून देणारी यंत्रणा कार्यन्वित केली आहे. केवळ निवडणूक काळासाठी कार्यालय उघडून संगणक, इंटनेट सुविधा उपलब्ध करून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांसाठी एक प्रकारचे मदत केंद्रच उघडले आहे. परंतु, कोणत्याही कामासाठी पैसे अदा करावे लागणार, ही अट आहे. (प्रतिनिधी)उमेदवारांकडून पैसे उकळायचे नवे तंत्र- अनेकांना निवडणूक खर्चाचे हिशेब रोजचे रोज कसे द्यायचे, याची माहिती देऊन आपणच ही सुविधा उपलब्ध करून देतो. आपल्याकडील एक व्यक्ती हे काम करेल, असे सांगून त्याचे शुल्क निश्चित केले आहे. या कार्यालयात हौसेखातर निवडणूक लढवणाऱ्यांची गर्दी होत आहे. उमेदवारांकडून पैसे कसे उकळायचे तंत्र अवगत असलेल्या या कार्यकर्त्यांने गेल्या दोन दिवसांत हजारो रूपयांचा गल्ला जमवला आहे.
आॅनलाईन अर्जासाठी थाटली दुकाने
By admin | Published: February 03, 2017 4:16 AM