पिंपरी : अनैतिक संबंध असलेल्या मैत्रिणीने लग्नासाठी तगादा लावला. त्यासाठी पत्नीला घटस्फोट दे, अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी मैत्रिणीने दिली. त्यामुळे मित्राने तिचा निर्घृणपणू खून केला. बालाजीनगर झोपडपट्टी येथे २७ एप्रिल २००८ रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी १४ वर्षांनंतर आरोपी मित्राला बेड्या ठोकल्या.
आप्पा गोमाजी मोहिते (वय ५०) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे त्याच्या मैत्रिणीसोबत अनैतिक संबंध होते. तो विवाहित असल्याने त्याने त्याच्या पत्नीला घटस्फोट देऊन मैत्रिणीसोबत लग्न करावे, असा तगादा मैत्रिणीने लावला. मात्र, आरोपीने नकार दिला. त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी मैत्रिणीने दिले. त्यामुळे आरोपीने मैत्रिणीचे केएसबी चौक, पिंपरी येथून अपहरण केले. तिला त्याच्या घरात कोंडून ठेवून तिची निर्घृणपणे हत्या केली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी गायब होता.
आरोपी हा नियमितपणे पत्ता बदलत ओळख लपवून फिरत होता. आरोपी हा एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील प्रकाश चव्हाण या गँगचा सक्रिय सदस्य असल्याने तसेच त्याच्याविरोधात यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत सारखे गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. आरोपीच्या १५ वर्षांपूर्वीचे सहआरोपी व प्रकाश चव्हाण गॅंगचे सदस्य यांच्या मार्फतीने तपास करण्याचे ठरविले. त्यानुसार तपास करत असताना आरोपीबाबत पोलिसांना माहिती मिळाली. आरोपी हा सध्या खेड तालुक्यातील वाकी या खेडेगावात लपून राहत असून चाकण एमआयडीसीमध्ये मिळेल त्याप्रमाणे मजुरी काम करत असल्याचे समोर आले. तसेच तो अल्पावधीतच औरंगाबाद येथे जाणार असल्याचे समजले. पोलिसांनी वाकी परिसरात सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे पोलिसांना सांगितले.
गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त डाॅ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस कर्मचारी सचिन मोरे, प्रशांत माळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.