पिंपरी : राज्य शासनाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या जागेवर विजयकुमार खोराटे यांना प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले. मात्र, तीन आठवडे होऊनही अतिरिक्त आयुक्त खोराटे ‘ॲक्टिव्ह मोड’वर आले नसल्याने त्यांच्याकडे असलेल्या १४ विभागांचे कामकाज संथगतीने सुरू आहे.
खोराटे यांच्याकडे असणाऱ्या पर्यावरण, क्रीडा आणि स्थापत्य विभागाची मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनानंतरही ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या वीज मीटरचा गोंधळ मिटलेला नाही. त्यामुळे त्या प्रकल्पानेही म्हणावा तसा वेग घेतलेला नाही. तीच गत इतर विभागांतील कामांबाबतीतही आहे.
या विभागांचे काम संथगतीने
प्रशासन, माहिती-तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय, क्रीडा, स्थापत्य प्रकल्प, वैद्यकीय, आरोग्य, आकाशचिन्ह व परवाना, निवडणूक, भूमी आणि जिंदगी, पर्यावरण, कायदा आणि बीआरटीएस प्रकल्प असे एकूण १४ विभाग आहेत. अतिरिक्त आयुक्तांकडे या विभागातील कर्मचारी काही कामासंदर्भात गेल्यानंतर ते विलंब लावत असल्याचा सूर अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून उमटत आहे.
पंधरा दिवस कामकाज ठप्प
खोराटे यांची नियुक्ती करण्याचे आदेश ६ जुलैला शासनाच्या नगरविकास विभागाने काढले होते. त्यानुसार खोराटे ७ जुलैला महापालिकेत रूजू झाले. मात्र, पंधरा दिवस त्यांच्या नियुक्तीचा तिढा कायम होता. ते फक्त दालनात हजेरी लावत. अतिरिक्त आयुक्त दोन या पदांचे कोणतेही कामकाज त्यांच्यामार्फत त्या काळात झाले नव्हते. त्यानंतर त्यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला. त्यातही त्यांनी फक्त वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला भेट दिली.
महापालिकेतील कोणत्याही विभागाचे कामकाज थांबलेले अथवा संथगतीने सुरू नाही. सगळे सुरळीत सुरू आहे. त्यामुळे या वावड्यांना काहीही अर्थ नाही.
- विजय खोराटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका