हणमंत पाटील -
पिंपरी : एक दिवस, एक महिना नाही, तर तब्बल २० वर्षांपासून मनातील राष्ट्रीय पक्षी मोराचा चित्रकलेतून अविरत अविष्कार सुरू आहे. पुण्यातील न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी हा छंद मनापासून जपला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने या मोराने पुन्हा पिसारा फुलविला आहे. न्यायाधीश सुनील हे २० वर्षापूर्वी मित्राबरोबर बीड जिल्ह्यातील केज येथील शेतात फिरायला गेले होते. त्यावेळी शेतात पिसारा फुलवून नाचणारा राष्ट्रीय पक्षी मोर त्यांनी प्रत्यक्ष पहिला. अन् तेव्हा पासून या मोराने त्यांच्या मनात कायमचे घर केले. आपल्या देशातील कोणताही राष्ट्रीय सण असो वा समारंभ या निमित्ताने त्यांच्या मनातील हा मोर पिसारे फुलवून नाचू लागतो. त्याचा नृत्याविष्कार अपोआप कागदावर रेखाटला जातो. अमृत महोत्सवी तिरंगी मोरांची संकल्प... चित्रकलेचे कोणतेही प्रशिक्षण व शिक्षण घेतलेले नाही. तरीही मनातील मोर रक्षाबंधनाला राखीच्या रुपाने, दिवाळीत दिव्याची आरास बनून, तर महाराष्ट्र दिन, प्रजासत्ताक व स्वातंत्र्य दिनी तिरंगा ध्वजाच्या अविष्कारातून पिसारा फुलवू लागतो. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी ९ ऑगस्टच्या क्रांतीदिनापासून तब्बल ७५ मोर तिरंगी पिसाऱ्याच्या नृत्याविष्कारातून साकारण्याचा संकल्प केला आहे. आतापर्यंत ५० हून अधिक तिरंगी मोर त्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून कागदावर रेखाटले आहेत.
"भारतीय अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय पक्षी मोराच्या प्रती असलेली मनातील भावना व आनंद चित्रकलेच्या माध्यमातून व्यक्त करीत आहे. आपल्या भारतीय राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने हा मोर माझ्या मनात पिसारा फुलवून नृत्याविष्कार करू लागतो. तोच कागदावर रेखाटण्याचा माझा प्रयत्न असतो." - सुनील वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश क्रमांक ४, शिवाजीनगर, पुणे.