पिंपरी : वृद्धाश्रमातून दागिने चोरून नेणाऱ्या केअरटेकर तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून दोन लाख ३५ हजार रुपयांचे दागिने हस्तगत केले. हिंजवडी पोलिसांनी ही कामगिरी केली. संकेत माणिकराव झाडे (वय २०, रा. सूस, ता. मुळशी, मूळ रा. खोक, ता. जिंतूर, जि. परभणी) असे अटक केलेल्या केअरटेकरचे नाव आहे. गोकर्णा बाबासाहेब बाभळकर (वय ४४, रा. सुस, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंवजडी पोलीस ठाण्यात १६ ऑक्टोबर रोजी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सूस येथे जिव्हाळा वृध्दाश्रम चालवितात. या वृद्धाश्रमात संकेत झाडे हा केअरटेकर म्हणून कामाला होता. फिर्यादीने १९ ऑगस्टला किचनमध्ये ४७ ग्रॅमचे सोन्याचे दागिने ठेवले होते.
दरम्यान, केअरटेकर झाडे हा अचानक ११ ऑक्टोबरला त्याच्या गावी गेला. त्यानंतर फिर्यादीने दिवाळीसाठी १६ ऑक्टोबरला दागिने पाहिले असता ते मिळून आले नाहीत. त्यामुळे त्यांनी झाडे याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. परभणी जिल्ह्यातील खोक येथे हिंजवडी पोलिसांचे पथक रवाना झाले. तेथून संकेत झाडे याला ताब्यात घेऊन १८ ऑक्टोबर रोजी अटक केली. चोरी गेलेल्या सोन्याच्या चार अंगठ्या, एक ब्रेसलेट व एक सोनसाखळी असे एकूण दोन लाख ३५ हजार रुपयांचे दागिने पोलिसांनी झाडे याच्याकडून हस्तगत केले.
पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, निरीक्षक सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख, सहायक निरीक्षक राम गोमारे, उपनिरीक्षक रमेश पवार, पोलीस कर्मचारी स्वामिनाथ जाधव, बाळकृष्ण शिंदे, बापूसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केगले, विक्रम कुदळ, अरूण नरळे, चंद्रकांत गडदे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिदे, सागर पंडीत यांनी केली आहे.
गावी जाण्याच्या घाईने बळावला संशय
केअरटेकर झाडे हा दिवाळी झाल्यानंतर गावी जाणार होता. मात्र, तो दिवाळीपूर्वीच गावी गेला. तसेच मी परत कामावर येणार नाही, असे त्याने फिर्यादी महिलेला सांगितले होते. त्यामुळे त्याच्यावरील संशय बळावला. पोलिसांनी झाडे याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.