वाकड (हिंजवडी) : ‘काल चारजण गेल्याची बातमी समजली, तर आज चालकाने बस पेटवल्याचे कळले आणि धक्काच बसला. अधूनमधून आमच्याकडे चहा किंवा खाण्यासाठी कामगार यायचे... गप्पा व्हायच्या. आमच्या शेजारच्या कंपनीत असं घडणं खूप वाईट आहे हो..’, व्योम ग्राफिक्स या मुद्रण कंपनीशेजारचा खानावळचालक सांगत होता. बुधवारी मिनी बसला चालकानेच लावलेल्या आगीत याच व्योम ग्राफिक्सच्या चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. सतत ये-जा असणाऱ्या या कंपनीमध्ये गुरुवारी शुकशुकाट होता. घटनास्थळापासून कंपनीपर्यंत सगळ्या आवारातच सन्नाटा जाणवत होता. बसचालकाच्या कृत्यामुळे संताप व्यक्त होत होता.
हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील फेज १मध्ये असणाऱ्या व्योम ग्राफिक्स या कंपनीच्या मिनी बसने बुधवारी सकाळी कर्मचारी घेऊन येत असताना पेट घेतला. त्यात चौघांचा होरपळून मृत्यू झाला, तर सहाजण जखमी झाले. पेटलेल्या चालत्या गाडीतून उडी मारल्याने काहींनी जीव वाचविला. गुरुवारी सायंकाळी पोलिस तपासात उघड झाले की, बसचालकानेच बस पेटवून कर्मचाऱ्यांना मारले असून, बसमधील सर्वांनाच मारण्याचा त्याचा डाव होता. त्यानंतर संतापाची लाट उसळली.
ग्राफिक्स आणि प्रिंटिंगची कंपनी असल्याने या कंपनीमध्ये साहित्याची ने-आण करण्यासाठी गाड्यांची वर्दळ असायची. दुपारी थोडावेळ पाय मोकळे करण्यासाठी कर्मचारी कंपनीजवळ असणाऱ्या जेवण व नास्त्याच्या खानावळीत जात असत. कालपर्यंत आपल्याकडे ग्राहक म्हणून येणाऱ्यांची वाईट बातमी ऐकून खानावळ चालकांनाही धक्का बसला. घटनेनंतर कंपनीच्या आवारात शुकशुकाट होता. सायंकाळी मृतदेह ताब्यात घेण्यावरून मृतांचे नातेवाईक आक्रमक झाले होते. नातेवाईक आणि कंपनीचे पदाधिकारी यांच्यातील चर्चेनंतर मार्ग काढण्यात आला. त्यानंतर जखमींनाही पुणे शहरात स्थलांतरित करण्यात आले. गुरुवारी कंपनी बंदच होती. अपघातातून वाचलेल्या कोणाशीच संपर्क होत नव्हता.
व्योम ग्राफिक्स कंपनीच्या आजूबाजूला प्लॅस्टिक आणि धातू उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत. त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला आहे. ते कर्मचारी खानावळीत आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर ताण जाणवत होता. ‘खानावळीत चहासाठी आम्ही भेटायचो... तेथील कर्मचाऱ्यांचे चेहरे आठवत आहेत; पण आता त्यापैकी नक्की चौघे कोण, हेच समजत नाही. चालकाने असे करावे, हे धक्कादायकच आहे’ ते सांगत होते. त्यांच्या बोलण्यात संतापही होता आणि अनामिक भीतीही ! या सगळ्या आवारात सन्नाटा जाणवत होता.
घटना समजल्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या जखमी कर्मचाऱ्यांची देखभाल करत आहोत. कर्मचाऱ्यांना सर्व सहकार्य करू. - नितेन शहा, मुख्य कार्यकारी अधिकारी, व्योम ग्राफिक्स
या भागातील अनेक कर्मचारी इथे येत असतात. व्योम ग्राफिक्स कंपनीमधील कर्मचारीही येत असतात. कालची घटना खूप वाईट आहे. अपघातात गेलेल्या आणि येथे येणाऱ्या कोणाचीच नावे माहिती नसली तरी ग्राहक म्हणून अपघातग्रस्तांबद्दल वाईट वाटते. - पवन राजू, खानावळचालक