पिंपरी : दुपारच्या सुमारास पहलगाम येथील बैसरण घाटी भागात कानठळ्या बसवणारे गोळीबाराचे आवाज सुरु झाले. काही समजण्याच्या आतच अचानक लोकांची पळापळ सुरू झाली, आम्हीही जीवाच्या आकांताने पुन्हा आमच्या हॉटेलच्या दिशेने पळालो, त्यावेळी कळलं कि दहशतवादी हल्ला झाला आहे, अंगावर काटाच आला, असे सांगत होते चिंचवडवरून पहलगामला गेलेले पर्यटक भाऊसाहेब दरंदले. पहलगाममधील घडलेल्या घटनेची कहाणी त्यांनी कथन केली.
पिंपरी- चिंचवड शहरातील चिंचवडमधील जेष्ठ नागरिक, मुले आणि महिला असा ३२ एक समूह, तर ताथवडे, पुनावळे येथील मी १२ जणांचा आणि वाल्हेकरवाडीतील ३ जण, आणि आकुर्डीतील ३ जण जम्मू काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. सर्वजण सुखरूप आहेत. चिंचवडमधील ग्रुप १३ एप्रिलला चिंचवडवरून जम्मू काश्मीर पर्यटनासाठी गेला होता. मंगळवारी दुपारी ते पहलगामला होते. बैसरण घाटी येथे मिनी स्वित्झरलँड म्हणून एक पॉईंट आहे. तिथे हे सर्व सहकारी निघाले होते. केवळ शंभर ते दीडशे मीटरचे अंतर शिल्लक राहिलं होतं आणि अचानक गोळीबार सुरू झाला.
अनुभव सांगताना भाऊसाहेब दरंदले म्हणाले, 'गोळीबाराचा आवाज कानी आला. सुरुवातीला वाटलं की फटाके वाजत असतील. मात्र, पुन्हा जोर -जोराने आवाज सुरू झाले आणि लोकांची पळापळ सुरू झाली. आमचाही गोंधळ उडाला. काय करावे कळेना. म्हणून आम्ही सर्वजण जीवाच्या आकांताने रस्ता दिसेल तिकडे जाऊ पळू लागले. तसे पहिले तर हा सर्व भाग कच्च्या रस्त्याचा आहे. आम्ही सगळे काही वेळातच हॉटेलमध्ये परतलो. त्यावेळेस कळाले की दहशतवादी हल्ला झाला आहे आणि त्यात अनेक लोकांचा जीव गेला आहे. त्यावेळी अंगावर शहारे आले. जशी वेळ पुढे सरकत होती. तशा प्रशासनाच्या गाड्या, रुग्णवाहिका, पोलीस मदतीसाठी धावाधाव करीत असल्याचे दिसून आले. त्यानंतर लष्करीपथकही दाखल झाले. सुरुवातीला आम्ही घाबरलो होतो. मात्र आम्ही सर्वजण सुखरूप होतो. वास्तविक सुरुवातीला किती मोठा किती मोठा हल्ला आहे. याबाबत माहिती मिळत नव्हती. दरम्यान आमच्या सर्व सहकाऱ्यांना त्यांच्या कुटुंब यांचे फोन येऊ लागले. आमच्या घरच्या सर्वांना चिंता होती. त्यामुळे बुधवारी सकाळीच आम्ही राजोरीच्या दिशेने निघालो. मात्र, या मार्गावर खूप ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. तसेच वाहतूकोंडीही झाली आहे. त्यामुळे आम्हाला झेलम गाडी पकडणे अवघड वाटत आहे.'
मदतीसाठी गुहार
पहलगाम ते राजोरी रस्त्यावर अनेक ठिकाणी तपासणी सुरु आहे. तसेच रस्ते अरुंद असल्याने वाहतूककोंडी झाली आहे. त्यामुळे चिंचवडचे पर्यटक अडकले आहेत. त्यांना सुखरूप आणण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहळ, खासदा र डॉ अमोल कोल्हे आणि भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी तेथील मदत कक्षला माहिती दिली आहे. तेथील येथील प्रशासनाची संवाद साधून पर्यटकाना पुन्हा चिंचवडला आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.