पिंपरी : घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून घरातून मौल्यवान ऐवज चोरून नेण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. घरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. शहरात सहा लाखांवर घरे असून, त्यातील सुमारे दोन लाख घरांना केवळ प्लायवूड किंवा लाकडी फाळके दरवाजे म्हणून वापरल्याचे दिसून येते. परिणामी चोरट्यांना घरफोडी करणे सहज शक्य होते. अशा चोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी घरांना मजबूत ‘सेफ्टी डोअर’ बसवावेत. तसेच ‘आपला शेजारी खरा पहारेकरी’ यानुसार नागरिकांनी शेजाऱ्यांशी सख्य राखावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नागरिकरण होत आहे. मोठमोठे गृहप्रकल्प उभारले जात असून, गगनचुंबी इमारती आकर्षण ठरत आहेत. मात्र, यातील बहुतांश फ्लॅटला सेफ्टी डोअर नसते. त्यामुळे अशा फ्लॅटच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच बाल्कनी व खिडक्यांसाठीचे ग्रील देखील तकलादू असल्याचे दिसून येते. या ग्रीलचे गज कापून किंवा कटावणीने सहज तोडून चोरटे घरात प्रवेश करून चोरी करतात. यात मौल्यवान ऐवजासह महत्त्वाची कागदपत्रे, विद्यूत आणि इलेक्ट्राॅनिक उपकरणे देखील चोरून नेली जातात. तसेच काही चोरटे घरात तोडफोड करून नुकसानही करतात.
चाळीस लाखांच्या फ्लॅटला ४० हजारांचा डोअर लावा ना भाऊ...
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सामान्य नागरिक २५ ते ४० लाख रुपयांना वन-बीएचके फ्लॅट घेऊन हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करतात. मात्र, घरासाठी ४० हजारांचे सेफ्टी डोअर लावण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे चोरट्यांचे फावते.
सुरक्षारक्षक असतानाही चोरी
आमच्या हाउसिंग सोसायटीसाठी सुरक्षारक्षक आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही आहेत. त्यामुळे घराला ‘सेफ्टी डोअर’ची आवश्यकता नसल्याचे काही जणांकडून सांगण्यात येते. मात्र, सुरक्षारक्षक असतानाही घरफोडीच्या घटना घडतात.
सुरक्षेसह घराच्या सौंदर्यात भर
तसेच ‘सेफ्टी डोअर’मुळे घराच्या सौंदर्यात बाधा येईल, असा समज असतो. मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आकर्षक, मजबूत सेफ्टी डोअर उपलब्ध होत आहेत. त्यामुळे सुरक्षेसह घराच्या सौंदर्यात देखील भर पडण्यास मदत होते.
नागरिकांनी खबरदारी घ्यावी
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत घरफोडीच्या घटना वाढत आहेत. यातील घरफोडीच्या काही गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. इतर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांची पथके प्रयत्नरत आहेत. मात्र, घरफोडी होऊ नये म्हणून नागरिकांनीही खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांककडून करण्यात येत आहे.
दहा हजारांत ‘सेफ्टी डोअर’
शहरात लोखंडी, स्टेनलेस स्टील, लाकूड आदींचा वापर करून तयार केलेले ‘सेफ्टी डोअर’ मिळतात. दहा हजारांपासून ४० हजारांपर्यंत मजबूत आणि सुरक्षित सेफ्टी डोअर उपलब्ध होतात. लाकूड तसेच काच व सजावटीसाठी वापर केलेल्या साहित्यानुसार त्याच्या किमती ठरतात. यात लॅच लाॅक, कॅमेरे, अलार्म, पारदर्शक काच, जाळी आदीचा वापर मागणीनुसार केला जातो.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत घरफोडीचे गुन्हे
वर्ष - दाखल - उकल झालेले२०१९ - ३८४ - ११६२०२० - २७१ - ११९२०२१ - ३५५ - १४७२०२२ (जुलैअखेर) - २३९ - ५३
आपला शेजारी सख्खा मित्र असतो. तोच आपल्या घराचा खरा रक्षक आहे, असे समजून शेजाऱ्यांच्या संपर्कात राहिले पाहिजे. घर भाड्याने देताना भाडेकरून व्यक्तीची माहिती असावी. त्याबाबत पोलिसांना माहिती दिली पाहिजे. अनोळखी व्यक्तींना हाउसिंग सोसायटीत प्रवेश देण्यात येऊ नये. संशयित व्यक्तींबाबत पोलिसांना कळवावे.
- डाॅ. प्रशांत अमृतकर, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे)
लोखंडी तसेच लाकडी सेफ्टी डोअरला देखील मागणी आहे. सेफ्टी डोअरमुळे घराची सुरक्षा होण्याबरोबरच व्हेंटीलेशनही होते. सेफ्टी डोअर किंवा खिडकीचे ग्रील करताना जाड गजाचा वापर केला पाहिजे. दोन गजांमध्ये जास्तीजास्त चार इंच अंतर असावे. तसेच त्याला आडवा सपोर्ट दीड फुटांपर्यंत असावा. त्यामुळे गज वाकवणे किंवा तोडणे सहज शक्य होत नाही. तसेच ग्रील किंवा सेफ्टी डोअरचे फिक्सिंग आतल्या बाजूने असावे.
- कुमार कदम, फॅब्रीकेशन व्यावसायिक, पिंपरी गाव