‘अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हे स्वप्न, ते लवकरच पूर्ण होईल’; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना विश्वास
By नारायण बडगुजर | Updated: March 29, 2025 23:21 IST2025-03-29T23:21:08+5:302025-03-29T23:21:50+5:30
विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार अण्णा बनसोडे यांचे शनिवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले.

‘अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हे स्वप्न, ते लवकरच पूर्ण होईल’; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना विश्वास
पिंपरी : माझं स्वप्न अजित पवार यांच्यामुळे पूर्ण झाले आहे. ते मुख्यमंत्री व्हावेत ही अवघ्या महाराष्ट्राचे स्वप्न आहे. ते लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला.
विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार अण्णा बनसोडे यांचे शनिवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले. त्यावेळी त्यांचे ठिकठिकाणी आतषबाजी करत तसेच फुलांची उधळण करत जंगी स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी बनसोडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
अण्णा बनसोडे म्हणाले, अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून एकदातरी पाहायचे आहे. ते मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्राची अपेक्षा आहे. ते लवकरच मुख्यमंत्री होतील. माझे स्वप्न होते. मी नगरसेवक व्हावे, स्थायी समिती सभापती व्हावे, आमदार व्हावे. हे सर्व स्वप्न अजित पवार यांच्यामुळे पूर्ण झाले. गेल्या वर्षी राज्यात पुन्हा महायुती सरकार आल्यानंतर मला मंत्री पद मिळेल असा विश्वास होता. मंत्रीमंडळात काहीतरी पद मिळेल असे वाटत होते. विधानसभा उपाध्यक्ष या संविधानिक पदावर माझी निवड करण्यात आली. मागासवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबातील माझ्यासारख्या व्यक्तीला अजित पवार यांनी विधानसभा उपाध्यक्ष केले. अजित पवार यांच्या चांगल्या आणि वाईट काळातही मी सोबत राहिलेलो आहे. त्या प्रामाणिकपणाचे हे फळ मिळाले आहे.
महापालिका निवडणुकीबाबत ज्येष्ठ नेते निर्णय घेतील
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी तसेच आरपीआय हे पक्ष महायुती म्हणून काम करत आहेत. या पक्षांचे ज्येष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आगामी महापालिका निवडणुकीसाठी मान्य असेल, असेही अण्णा बनसोडे यांनी सांगितले.