पिंपरी : युनायटेड किंगडम येथील साॅफ्टवेअर इंजिनियर पत्नी आणि मुलांसह लग्न तसेच फिरण्यासाठी लंडन येथून भारतात आला. मात्र, प्रवासात त्याचे सात लाख ६० हजार रुपये किमतीचे दागिने लंपास झाले. हा प्रकार ९ डिसेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत घडला.
सचिन हरी कामत (४४, रा. वाकड. मूळ रा. युनायटेड किंगडम) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कामत साॅफ्टवेअर इंजिनियर आहेत. ते युनायटेड किंगडम येथे एका नामांकित कंपनीत नोकरीला आहेत. नातेवाईकांकडील लग्न समारंभ तसेच नवीन वर्षानिमित्त फिरण्यासाठी इंजिनियर कामत हे त्यांची पत्नी आणि मुलांसह लंडन ते मुंबई वाया जेड्डा असे विमानाने आले. लंडन येथून निघताना त्यांनी त्यांच्या साहित्याच्या चार बॅग सीलबंद न करता सौदिया एअरलाईन्सकडे दिल्या. त्या चार बॅगमध्ये त्यांनी कपडे, अत्तर, चाॅकलेट, इलेक्ट्रिक उपकरणे आणि १५२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ठेवले होते.
फिर्यादी कामत हे लंडन येथून विमानाने जेड्डा येथे आले. तेथून दुसऱ्या विमानाने मुंबई येथे आले. दरम्यान जेड्डा येथे विमान बदलल्याने त्यांच्याकडील साहित्याच्या बॅग दुसऱ्या विमानाने पाठवून देण्याचे विमान कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले. त्यानंतर फिर्यादी कामत हे मुंबई विमानतळावर आले. मात्र, त्यांना त्यांच्या बॅग मिळाल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी बॅगचे आयडी मुंबई विमानतळ येथे जमा केले. त्यानंतर कुरिअर कंपनीद्वारे त्यांना त्यांच्या बॅग वाकड येथे मिळाल्या. त्यांनी बॅग तपासून पाहिल्या असता त्यात त्यांचे सात लाख ६० हजारांचे दागिने आढळून आले नाहीत. अज्ञात इसमाने हे दागिने चोरून नेले, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक भरत माने तपास करीत आहेत.