पिंपरी : पतीने नवीन मोबाइल घेण्याचा हट्ट न पुरविल्याने रुसलेल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काळेवाडीतील पवनानगर येथे बुधवारी (११ सप्टेंबर) ही घटना घडली. शिवानी गोपाल शर्मा (वय २०, रा. पवनानगर, काळेवाडी, मूळ गाव उत्तरप्रदेश) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानी आणि गोपाल शर्मा यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. ते काळेवाडीत वास्तव्यास होते. गोपाल खासगी कंपनीत सीएनसी मशीन ऑपरेटर म्हणून काम करतात. गेल्या चार ते पाच दिवसांपासून त्यांची पत्नी शिवानी नवीन मोबाइल घेण्याचा हट्ट करत होती. ‘तुम्ही कामावर गेल्यानंतर घरी मी एकटीच असते, मोबाइलमुळे माझा वेळ जाईल’, असे तिचे म्हणणे होते. मात्र, पैसे नसल्याने पगार झाल्यावर नवीन मोबाइल घेऊ, असे गोपाल यांनी सांगितले. त्यावरून शिवानी रुसली होती.
दरम्यान, गोपाल वापरत असलेला मोबाइल काही तांत्रिक कारणाने बिघडला. त्यांच्या कंपनीचे फोन येत असल्याने त्यांना नवीन मोबाइल घ्यावा लागला. त्यानंतर त्यांनी जुना मोबाइल दुरुस्तीला देऊन तो मोबाइल पत्नीला देण्याचे ठरविले. मात्र, याबाबत त्यांनी पत्नीला काही कळविले नाही. त्यांनी स्वत:ला नवीन मोबाइल घेतल्याचे पत्नीने पाहिले. त्यावरून तिने गोपाल यांच्याशी भांडण केले. बुधवारी सकाळी गोपाल नेहमीप्रमाणे कामाला गेले. सायंकाळी सात वाजता घरी आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा लावलेला दिसला. दरवाजा उघडून ते आत गेले असता पत्नीने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. त्यांनी ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. आत्महत्या केलेल्या महिलेच्या पतीचा जबाब नोंदविला आहे. नवीन मोबाइल घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे, असे कोल्हटकर यांनी सांगितले.