पिंपरी : शहरामध्ये मुले आणि मुली यांच्या जन्मदरामध्ये मोठी तफावत आढळून येत आहे. शहरात जन्माला येणाऱ्या एक हजार मुलांमागे फक्त ९०० मुलींचा जन्म होत आहे. परिणामी भविष्यामध्ये मुलांना लग्नासाठी मुली मिळण्यास अडचण येऊन विवाहसंस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे. स्त्री भ्रूणहत्येसाठी कडक कायदे आहेत. मात्र, तरीही मुले आणि मुलींच्या जन्मदरामध्ये तफावत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वंशाला दिवा पाहिजे म्हणून अनेक चालीरिती ग्रामीण भागासह शहरी भागात आहेत. हुंडा पद्धत आणि अंधश्रद्धेमुळे अनेकांना मुलींचा जन्म नकोसा वाटतो. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरातील मुलांच्या जन्मामागे मुलींची संख्या कमी असल्याचे दिसून येते. शहरामध्ये एक हजार मुलांमागे २०१८ मध्ये सर्वात कमी म्हणजे ८८५ मुली होत्या. २०१९ मध्ये थोडी सुधारणा होऊन ९०७, २०२० मध्ये ९३०, २०२१ मध्ये ९२० तर २०२२ मध्ये पुन्हा मुलींचा जन्मदर घटल्याचे दिसून येत आहे. या वर्षात एक हजार मुलांमागे फक्त ८९६ मुली जन्माला आल्या असल्याचे समोर आले आहे. लिंग निदान करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे लिंग चाचणी कोणी करू नये, असे आवाहन वैद्यकीय विभागाकडून केले जाते. त्यामुळे वंशाला दिवा पाहिजे ही संकल्पना काही अंशी कमी होत आहे. मात्र तरीही शहरातील काही भागांमध्ये अंधश्रद्धेला लोक बळी पडत आहेत. त्यामुळे चोरून लिंग चाचणी केली जाते. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने अशा केंद्रांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. मुलींचा जन्मदर असाच घटत राहिला तर भविष्यामध्ये त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत.
जनजागृती करण्याची आवश्यकता मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी वैद्यकीय विभागातर्फे सातत्याने जगजागृती करण्यात येत आहे. याअंतर्गत वस्तीपातळीवर जाऊन जनजागृती, गर्भपात केंद्रांची वारंवार तपासणी, गर्भलिंग निदान कायद्याची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
आकडेवारीवर एक नजर (एक हजार मुलांमागे मुलींची संख्या) वर्ष - मुलींची संख्या २०१८ - ८८५२०१९ - ९०७२०२० - ९३०२०२१ - ९२०२०२२- ८९६
गर्भलिंग चाचणी व स्त्री भ्रूणहत्येबाबत वारंवार जनजागृती केली जाते. शहरात गर्भलिंग निदान कायद्याची कडक अमंलबजावणी केली जात आहे. याबाबत गर्भपात केंद्राच्या तक्रारी आल्या नाहीत. तक्रार आल्यास कडक कारवाई करण्यात येईल. - डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.