देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 337 व्या पालखी सोहळ्याच्या तयारी पुर्ण झाली असून श्री संत तुकाराम महाराज संस्थान व प्रशासन देखील भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने श्री क्षेत्र देहूगावत आलेल्या वारकऱ्यांमुळे सारा परिसर भक्तीमय झाला आहे. परिसरात हरिनामासह ज्ञानोबा तुकाराम यांच्या नामाचा गजर सुरू असून भाविक भक्तीरसात डुबंलेले पाहायला मिळत आहे. सोमवारी (उद्या) दुपारी २.३० वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. अन्नदात्या बळीराज्याला पावसाची प्रतिक्षा अजुन संपली नसली तरी हरि भेटीसाठी मात्र पावलोपावली आसुसलेला पहायला मिळत आहे. तब्बल दोन वर्षानंतर प्रत्यक्ष पांडूरंगाची भेट अवघ्या काही दिवसातच होणार या विचारानेच चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत आहे. आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हामुळे भाविकांसह स्थानिकांच्या जीवाची काहील होत असतानाच आज काहीसे ढगाळ हवामानामुळे भाविकांचे जथ्थे भजनामध्ये दंग झालेले पाहायला मिळत आहे. सारा परिसर भक्तीरसात न्हाऊन निघत असल्याचे पहायला मिळत आहे. येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, वैंकुठगमण मंदिर, विठ्ठलनगर, येथील पादुका मंदिर व चिंचोली पादुका मंदिर व अनगडशहावली दर्गा परिसरासह इंद्रायणीच्या नदीकाठावर भाविकांची गर्दी दिसून येते आहे. वारकरी भागवत धर्माची भगवी पताका घेऊन तर महिला तुळशी वृदांवन डोक्यावर घेऊन आनंदात नाचत अभंग गात मंदिराच्या परिसरात फुगड्या घालत आहे. या भाविकांच्या सेवेसाठी स्थानिक प्रशासन सज्ज असून आजही काही भागातील रस्त्यांच्या कडेला पाणी साचलेल्या जागा व खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. रस्त्याच्या कडेला पडलेला राडारोडा उचलण्याचे काम युध्दपातळीवर सुरू होते. पालखी सोहळ्याच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तालाही कालपासूनच सुरवात झाली आहे.
"ग्यानबा तुकाराम ज्ञानोबाची पालखी" अन् टाळ - मृदंगाच्या गजरात निघणार तुकोबांची पालखी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 6:56 PM