पिंपरी : लग्नासाठी अडसर ठरू नये म्हणून गरम पाण्यात बुडवून सव्वा वर्षाच्या मुलाचा खून करण्यात आला. मुलाच्या आईच्या मैत्रिणीलाही ठार मारण्याची धमकी देण्यात आली. अखेर पोलिसांनी तिला बोलते केले आणि गुन्ह्याची उकल झाली. चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत एप्रिल २०२३ मध्ये हा प्रकार घडला होता.
पतीपासून विभक्त असलेली विवाहिता तिच्या सव्वा वर्षाच्या मुलासह चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत होती. तिचे विवाहित तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याने लग्नाचा तगादा लावला. मात्र, तिच्याकडून टाळाटाळ करण्यात येत होती. तिच्या मुलामुळे ती लग्नास तयार नसावी, असे प्रियकर तरुणाला वाटले. ती घराबाहेर गेली असताना तिची मैत्रीण आणि सव्वा वर्षाचा चिमुरडा घरात होते. त्यावेळी तेथे आलेल्या प्रियकराने घरातील बाथरूममधील गरम पाण्याच्या बादलीमध्ये चिमुरड्याला बुडविले. त्यात भाजल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली.
दरम्यान, पोलिसांना संशय आला. त्यामुळे चौकशी सुरू केली. यात चिमुरड्याच्या आईची मैत्रीण घटनेच्या दिवशी घरात होती, अशी माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली. तिच्या समोरच प्रियकर तरुणाने मुलाला गरम पाण्यात बुडविल्याचे तिने सांगितले. तिचा गळा दाबून कोणाला काही सांगितले तर तुझाही खून करीन, अशी धमकी प्रियकराने दिली होती. त्यामुळे याबाबत कोणाला काही सांगितले नाही, असे तिने सांगितले. त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
खूनप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे माहिती झाल्यानंतर प्रियकर तरुण पसार झाला. पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांकडे चौकशी सुरू केली. मात्र, माहिती मिळत नव्हती. त्याची पत्नी त्याच्यापासून विभक्त झाल्याने तो एकटाच राहत होता. त्यामुळे त्याच्या घराचा पत्ता नव्हता.
प्रियकर तरुणाच्या मोबाइल ‘काॅल’ची माहिती पोलिसांनी घेतली. तरुण त्याच्या जवळच्या एकाला सातत्याने फोन करत असल्याचे समोर आले. त्यामुळे त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचवेळी प्रियकर तरुणाचा त्या व्यक्तीला फोन आला. त्यावरून पोलिसांनी त्याची माहिती घेतली. सापळा रचून त्याला पकडले.
प्रियकर तरुणाने निर्घृणपणे चिमुरड्याचा खून केला. सुरुवातीस हा अपघात असल्याचे वाटत होते. मात्र, चिमुरड्याच्या आईच्या मैत्रिणीला बाेलते केले आणि खुनाच्या घटनेचा उलगडा झाला. एका फोन काॅलवरून माग काढला आणि सापळा लावून तरुणाला पकडले. - शैलेश गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक