नारायण बडगुजर
पिंपरी : शहरातील मुख्य चौकांमध्ये सिग्लन जम्पिंग केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. मात्र, यातील काही चौकांमध्ये सिग्नलवर टायमर घड्याळे बंद आहेत. त्यामुळे सिग्नल जम्पिंगचे प्रकार वाढले आहेत. पादचाऱ्यांनाही अशाच समस्येला सामोरे जावे लागत आहे. चौकांमधील झेब्रा क्राॅसिंग करण्यासाठी लाल-हिरवा माणूस (सिग्नल) असलेले दिवे लावण्यात आलेले आहेत. मात्र, तेही गायब झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. त्यासाठी इ-चलानच्या माध्यमातून कोट्यवधींचा दंड आकारण्यात आला. यात सिग्नल जम्पिंगचे प्रकार जास्त आहेत. मात्र, यातील काही वाहनचालकांना नाहक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. सिग्नलवरील टायमर घड्याळे नादुरुस्त झाली आहेत. तसेच काही घड्याळे बंद आहेत. काही ठिकाणी टायमर घड्याळे नाहीत. त्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ होतो. नेमके किती वेळ सिग्नलवर थांबावे लागेल याचा अंदाज येत नाही. यातूनच काही जणांकडून सिग्नल जम्पिंग होते.
पुणे-मुंबई महामार्गावरील मुख्य चौकांतील समस्या
शहरातील सिग्नलवर ‘लोकमत’ प्रतिनिधीकडून पाहणी करण्यात आली. यावेळी शहरातील मुख्य मार्ग असलेल्या पुणे-मुंबई महामार्गावरील मोरवाडी चौक, चिंचवड स्टेशन येथील महावीर चौक, आकुर्डी येथील खंडोबा माळ चौक येथील सिग्नलवर टायमर घड्याळ नाही. तसेच वाकड येथे बीआरटी मार्गावरील मुख्य चौकात देखील टायमर घड्याळ नाही. यासह शहरातील अन्य मुख्य चौक तसेच सिग्नलवर देखील ही समस्या आहे.
झेब्रा क्राॅसिंग करायचे कसे?
शहरातील मुख्य चौकात पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्राॅसिंग करण्यात आले आहे. तसेच झेब्रा क्राॅसिंगजवळ पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र सिग्नल व्यवस्था आहे. त्यावर हिरव्या दिव्यातील माणसाचे चिन्ह प्रकाशमान झाल्यानंतर पादचाऱ्यांना झेब्रा क्राॅसिंग करता येते. तसेच लाल दिव्यातील माणसाचे चित्र प्रकाशमान झाल्यास झेब्रा क्राॅसिंग करू नये, असा त्यातून संदेश दिला जातो. मात्र, शहरातील काही चौकांमधील पादचाऱ्यांसाठीचे हे सिग्नल गायब झाले ओहत. तसेच काही चौकांमधील सिग्नल बंद आहेत. त्यामुळे झेब्रा क्राॅसिंग करायचे कसे, असा प्रश्न पादचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
पादचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात
शहरात पुणे-मुंबई महामार्ग, स्पाईन रस्ता, मुकाई चौक ते औंध बीआरटी मार्ग, वाकड ते नाशिक फाटा बीआरटी मार्ग, काळेवाडी फाटा ते आटो क्लस्टर बीआरटी मार्ग असे काही प्रशस्त रस्ते आहेत. या मार्गांवरील चौक ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांंना मोठी कसरत करावी लागते. काही पादचारी जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडतात. तसेच दिव्यांग, अंध पादचाऱ्यांनाही धोका पत्करून रस्ता ओलांडावा लागतो.
‘स्मार्ट सिटी’ केवळ कागदावरच...
‘स्मार्ट सिटी’ योजनेंतर्गत शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी अद्यावत सीसीटीव्ही कॅमेरे, सिग्नल यंत्रणा उभारण्यात येत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून केवळ या योजनेचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. अद्यापही सिग्नल यंत्रणा अद्ययावत करण्यात आल्याचे दिसून येत नाही. पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून सिग्नल व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबतची समस्या सातत्याने महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहे. मात्र, त्याला देखील केराची टोपली दाखवण्याचा प्रका महापालिका प्रशासनाकडून हाेत असल्याचे दिसून येते.
पोलिसांकडून ४११५० जणांवर कारवाई
पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत सिग्नल जम्पिंग प्रकरणी ४११५० वाहनचालकांवर कारवाई केली. यात ८२ लाख ३० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच काही प्रकणांमध्ये खटले देखील दाखल करण्यात आले.