- भानुदास पऱ्हाड
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदी मागील दोन दिवसांपासून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात फेसाळली आहे. रसायनमिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडणे, मैलामिश्रित पाणी नदीत सोडणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. विशेष म्हणजे थेट अधिवेशनात इंद्रायणी जलप्रदूषणाचा मांडलेला मुद्दा, नागरिकांची वारंवार उपोषणे व आंदोलने करूनही हा प्रश्न गांभीर्याने घेतला जात नाही.
मागील अनेक दिवसांपासून इंद्रायणी नदी प्रदूषित होत आहे. औद्योगिक वसाहत क्षेत्रातून प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी पात्रात सोडले जात असलेले रसायनमिश्रित पाणी व सांडपाणी हे नदीतील पाणी प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. त्या पाण्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पांढराशुभ्र फेस निर्माण होत आहे. जुन्या बंधाऱ्याखालील नदीपात्रातील पाणी या पांढऱ्या शुभ्र तरंगणाऱ्या फेसाने झाकून जात आहे. अगदी पाण्यावर तरंगणारा फेस पाहून समक्षदर्शींना बर्फाच्छादित भागाची आठवण होत आहे. इंद्रायणीत रसायनयुक्त सांडपाण्यामुळे जलचर जीवांचे जीव धोक्यात आले आहे. तसेच इंद्रायणी नदीपात्रातील पाणी शेतपंपाद्वारे शेतीला नेले जाते. प्रदूषित पाणी विविध पिकांना दिले जाते. त्या प्रदूषित पाण्याचा पिकांवर दूरगामी परिणाम होतो. परिणामी ही पिके माणसांसह जनावरांच्या आरोग्यासाठी खाणे अपायकारक ठरत चालली आहेत. या नदीपात्राच्या प्रदूषित पाण्यामुळे जवळपास असणाऱ्या विहिरी, बोअर यांच्या पाण्यामध्ये परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. तर इंद्रायणीतील पाणी तीर्थ म्हणून प्राशन करणाऱ्या व त्यात स्नान करणाऱ्या वारकऱ्यांना पोटाचे विकार, तसेच त्वचाविकार देखील पसरण्याचा धोका संभवतो आहे. याबाबत नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
उपाययोजना कागदावर...
हिवाळी अधिवेशनात तत्कालीन आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी इंद्रायणीच्या वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा शासनासमोर लक्षवेधी करून मांडला होता. त्यावेळी मंत्री उदय सामंत यांनी इंद्रायणी नदीबाबत सकारात्मक पावले उचलणार असून इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करणार असल्याची ग्वाही दिली होती. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही त्यावर उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे केवळ कागदी घोडे नाचविण्यात प्रशासन मग्न असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया स्थानिक जनतेकडून व्यक्त होत आहेत.
इंद्रायणी नदीबाबतची उदासीनता दूर होणार का?
एकीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डोळ्यांवर पट्टी बांधली आहे, तर दुसरीकडे राज्य सरकार केवळ आश्वासनं देण्यावर धन्यता मानत आहे. इंद्रायणी नदीने मोकळा श्वास घ्यावा एवढीच स्थानिक जनता व वारकऱ्यांची माफक अपेक्षा आहे.