चाकण : श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या पार्श्वभूमीवर भरणाऱ्या कार्तिकी वारीला पुणे-नाशिक महामार्गावरून आळंदीला जाणाऱ्या दिंड्यांची संख्या मोठी आहे. मात्र, सतत वाहनांनी वर्दळ असणाऱ्या या महामार्गावर वारकऱ्यांची सुरक्षा ‘रामभरोसे’ असून, पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी वारकरी संप्रदायाकडून केली जात आहे. श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी कार्तिकी वारीसाठी दर्शनानिमित्त हजारो वारकरी पालखीसोबत दिंड्या काढून दरवर्षी आळंदीला येतात.नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांतील दिंड्या पुणे-नाशिक महामार्गावरून आळंदीकडे प्रस्थान करत असतात. राजगुरूनगर ते आळंदी हा मार्ग अतिवर्दळीचा आणि रहदारीचा धोकादायक आहे. अपघातप्रवण पट्ट्यात दिंडीकरी जीव मुठीत धरून चालतात. दिंडीमध्ये सर्वांत पुढे पताकाधारी, त्यामागे टाळकरी, विणेकरी आणि त्यामागे तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला आणि भाविक असा क्रम असतो. पुढे पताकाधारी चालत असल्याने दिंडी वाटचाल करीत आहे. महामार्गावर चुकीच्या बाजूने वाहन ओलांडणारी भरधाव वाहने दिंडीत घुसल्याचे आतापर्यंत झालेल्या अपघातातून लक्षात आले आहे. अनेक दिंड्या पहाटे मार्गस्थ होतात. वाहनचालकांची साखरझोपेची वेळ अपघातास कारणीभूत ठरू शकते. दरवर्षी या दिंड्यांमधील वारकऱ्यांवर अपघाताची टांगती तलवार अजूनही कायम आहे.आळंदी कार्तिकी यात्रेच्या बैठकीत दिंड्यांच्या रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांचा विषय कधीही प्राधान्याने चर्चेला येत नाही. त्यामुळे पायी चालणाऱ्या दिंड्यांची सुरक्षा रामभरोसे असल्याने पुणे-नाशिक महामार्गावर कार्तिकी दिंड्यांची वाट बिकट तितकीच अपघाती ठरत आहे. पंढरपूर पालखी मार्गावर कोट्यवधी रुपये खर्च करणारे सरकार इतर महत्त्वाच्या दिंडी मार्गावर साथी रस्ते सुरक्षेची आणि तात्पुरत्या सुविधा पुरवल्या जात नाही, याबद्दल वारकरी खंत व्यक्त करीत आहेत.दिंडीमधील वारकऱ्यांची स्वयंसेवकांद्वारे काळजी घेतली जाते. बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघाताचा धोका संभवतो. धर्माचे रक्षण करणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या रक्षणाची जबाबदारी अथवा दखल सरकार घेत नाही, याची खंत वाटते. दिंडी मार्गावरील स्थानिक पोलिसांनी त्यांच्या हद्दीत वारकऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्याची गरज आहे.- ज्योतीताई महाराज गरुड, चाकण
आळंदीकडे पायी जाणाऱ्या दिंड्यांची सुरक्षा रामभरोसे; वारकऱ्यांकडून सुरक्षा पुरविण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 5:13 PM