पिंपरी : दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून सोन्याचे दागिने, चांदीची भांडी, देवाचे चांदीचे दागिने, असा एकूण पाच लाख ७० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. घरफोडीचा हा प्रकार शनिवारी (दि. २१) सायंकाळी पाच ते रविवारी (दि. २२) सकाळी सव्वासात या कालावधीत केशवनगर शाळेजवळ, चिंचवडगाव येथे घडला.
विवेक विष्णूपंत मुद्देबिहाळकर (वय ५९, रा. साई साठे पार्क, केशनगर शाळेजवळ, चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचे भाऊ विनायक मुद्देबिहाळकर यांच्या घरी पुणे येथे गेले. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घराचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातून १६.०५ तोळे सोन्याचे दागिने, २.५ किलो चांदीची भांडी आणि देवाचे चांदीचे दागिने, असा एकूण पाच लाख ७० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.