पिंपरी चिंचवड : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी निघालेली मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा पहाटे पावणे सहाच्या सुमारास भक्ती शक्ती चौक निगडी येथे पोहोचली. प्रचंड मराठा समाजाचा उत्साह दिसून आला. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रात्र जागून काढली.
पिंपरी चिंचवड मधील सांगवी फाट्यावर बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शहरांमध्ये जरंगे पाटलांची पदयात्रा पोचली होती. सांगवी फाटा पिंपळे निलक चौक, जगताप डेरी काळेवाडी फाटा डांगे चौक, थेरगाव बिर्ला हॉस्पिटल चौक, चिंचवडगाव, चिंचवड स्टेशन, काळभोर नगर आकुर्डी, खंडोबा माळ चौक, टिळक चौक, शहराच्या सीमेवर भक्ती शक्ती चौक मार्गे शहराचे पोहोचली.
रात्रभर मराठा समाजाने जागून काढली
मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी, मराठा आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे पाटील यांनी काढलेल्या मुंबई पदयात्रेस पिंपरी चिंचवड शहरात अलोट गर्दीने प्रतिसाद दिला. रात्रभर पदयात्रा मार्गावर गर्दी झाली होती. भक्ती शक्ती चौकामध्ये पदयात्रा गुरुवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास पोहोचली.
कोण आला रे कोण आला मराठ्यांचा वाघ आला..., जय भवानी जय शिवाजी... एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या आणि जरांगे पाटलांचे आगमन झाले. जोरदार फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली. पदयात्रा पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी रात्र जागून काढली.