पिंपरी: परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ होत असल्याने नदीकाठच्या रहिवाश्यांना महापालिकेच्या वतीने ध्वनीक्षेपकाद्वारे सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. महापालिकेचे आपत्कालीन पथक अशा भागात प्रत्यक्ष गस्त घालीत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वतंत्र पथकाद्वारे नदीकाठच्या भागावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. महापालिका मुख्यालयात मध्यवर्ती तसेच क्षेत्रीय कार्यालयनिहाय २४ तास नियंत्रण कक्ष सज्ज आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे.
महापालिकेच्या वतीने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुख्य रस्त्यांवर पाणी साचून दळणवळण व्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो म्हणून क्षेत्रीय कार्यालय निहाय स्वतंत्र पथक तैनात केले आहे. चेंबरमध्ये कचरा अडकून पाणी तुंबू नये यासाठी आरोग्य पथकाची नेमणूक केली आहे. पाणी साचलेल्या भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी त्या भागात तात्काळ पाणी उपसा यंत्रणा वाहन पाठवून आवश्यक कार्यवाही करावी, तुटलेले चेंबर तात्काळ दुरुस्त करावे, असे निर्देश आयुक्त यांनी दिले आहेत. साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये यासाठी घरोघरी सर्वेक्षण करून आरोग्य तपासणी मोहीम राबविणे, धुरीकरण करणे, पावसामुळे शहरातील महत्वाच्या चौकांच्या ठिकाणी वाहतूककोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनासमवेत योग्य समन्वय ठेवून आपत्कालीन परिस्थिती हाताळणे, आदी सूचना आयुक्त सिंह यांनी दिल्या आहेत. धोकादायक ठिकाणांची पाहणी करून त्या अनुषंगाने संबंधित विभागांमार्फत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरु आहे. पूरबाधित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नियोजन केले आहे. स्थलांतरित ठिकाणी आवश्यक सुविधा, भोजन तसेच वैद्यकीय सेवा आदी बाबींचे नियोजन आणि व्यवस्थापन देखील केले आहे. पूर परिस्थिती उद्भवल्यास ती हाताळण्यासाठी संभाव्य धोक्याच्या ठिकाणांची पाहणी करून त्यावर संबंधित विभागामार्फत तातडीने उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती महापालिका आपत्कालीन विभागाचे नियंत्रण अधिकारी अतिरिक्त आयुक्त चंद्रकात इंदलकर यांनी दिली. पवना धरण ९९.४२ टक्के भरलेपवना धरण ९९.४२ टक्के भरलेले असून पाणीसाठा नियंत्रित करण्याकरिता जलविद्युत केंद्रामधून विदुयतगृहाद्वारे १४०० क्युसेक्स व धरणाच्या सांडव्यावरून २१६० क्युसेक्स क्षमतेने नदीपात्रात विसर्ग चालू आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याने पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार आज २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता सांडव्याद्वारे होणा-या विसर्गामध्ये वाढ करून ४२६० क्यूसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. सांडव्यावरील विसर्गानंतर नदीपात्रामध्ये एकूण ५६६० क्यूसेक्स इतका विसर्ग सुरू झाला आहे.