पिंपरी : अमेरिकेहून पाठवलेले गिफ्ट कस्टममध्ये अडकले आहे, असे सांगून गिफ्ट सोडवण्यासाठी तरुणीकडून तब्बल दीड लाख रुपये उकळण्यात आले. ही घटना १६ ऑगस्ट २०२२ रोजी घडली. या प्रकरणी तरुणीने देहुरोड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.३) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी यश अग्रवाल याच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची आरोपीशी ओळख जीवनसाथी या वेंडींग साईटवर झाली होती. आरोपीने फिर्यादीला सांगितले की तिच्यााठी अमेरिकेहून गिफ्ट पाठवले आहे. काही दिवसांनी फिर्यादीच्या फोनवर एका महिलेचा फोन आला त्या महिलेने आपण दिल्लीमधील इंदिरा गांधी एअरपोटच्या कस्टम डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगितले. गिफ्टमध्ये महागड्या वस्तू असल्याचे सांगत त्यासाठी चार्जेस भरण्यासाठी नाजिस अहमद नावाच्या व्यक्तीचा बँक अकाऊंट नंबर पाठवला.
फिर्यादीने आरोपी यशला फोन केला असता त्याने पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादीने महिलेने पाठवलेल्या बँक अकाऊंट नंबरवर ३८ हजार ५०० रुपये पाठवले. मात्र, फिर्यादीला आरोपी महिलेचा पुन्हा फोन करून गिफ्ट २० हजार अमेरिकन डॉलरचे असल्याचे सांगून एक लाख ४८ हजार रुपये सिक्युरीटी डीपॉझिट भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने एक लाख ४८ हजार २५० रुपये बँक अकाऊंटवर ट्रान्सफर केले. मात्र नंतर फिर्यादीला समजले की आरोपी यश आणि महिलेने मिळून तिची फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे.