पिंपरी : दिल्लीत चोरलेली चारचाकी वाहने बनावट कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्रात विकणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने पर्दाफाश केला. या कारवाईमध्ये एक कोटी ५७ लाख रुपये किमतीच्या ११ आलिशान चारचाकी गाड्या पोलिसांनी हस्तगत केल्या.
शशिकांत प्रताप काकडे (३०, रा. साखरवाडी, पिंपळवाडी, ता. फलटण, जि. सातारा), अजीम सलीम पठाण (३४, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा), राजाराम उर्फ राजू तुकाराम खेडेकर (३४, रा. पटवर्धन कुरोली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), महेश भीमाशंकर सासवे (३१, रा. विजापूर रोड, सोलापूर), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह प्रशांत माने, विकास माने (दोघेही रा. रहिमतपूर, जि. सातारा), भरत खोडकर (रा. सांगली), हाफिज (रा. मेरठ, उत्तर प्रदेश), इलियास (रा. बेंगळूर), रसूल शेख (रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) यांच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात एक वाहन चोर येणार असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकातील सहायक फौजदार महेश खांडे आणि पोलिस हवालदार नितीन लोखंडे यांना मिळाली. त्यानुसार शशिकांत काकडे, अजीम पठाण या दोघांना दोन चारचाकी गाड्यांसह ताब्यात घेतले. त्यातील एक गाडी चाकण परिसरातून चोरी झाली होती. त्याबाबत २०२१ मध्ये चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
दोन्ही संशयितांकडे मिळालेल्या गाड्यांव्यतिरिक्त आणखी चोरीच्या गाड्या असून त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे त्या गाड्यांचे व्यवहार केले असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर चाकण येथे दाखल असलेला वाहन चोरीचा गुन्हा दरोडा विरोधी पथकाकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला. दोघांकडून दिल्ली, हरियाणा, आणि राजस्थान येथील एक कोटी ५७ लाख रुपये किमतीची ११ आलिशान चारचाकी वाहने जप्त केली. शशिकांत आणि अजीम यांच्यासोबत राजाराम खेडेकर महेश सासवे, प्रशांत माने, विकास माने, भरत खोडकर, हाफिज, इलियास, रसूल शेख अशी अंतरराज्यीय टोळी असल्याचे निष्पन्न झाले.
सहायक पोलिस आयुक्त बाळासाहेब कोपनर, सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहायक निरीक्षक अंबरीश देशमुख, उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलिस अंमलदार महेश खांडे, औदुंबर रोंगे, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, राहुल खारगे, नितीन लोखंडे, गणेश हिंगे, आशिष बनकर, प्रवीण माने, सागर शेडगे, प्रवीण कांबळे, गणेश कोकणे, अमर कदम, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, समीर रासकर, चिंतामण सुपे, नागेश माळी, पोपट हुलगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
टोळीमध्ये पोलिसाचाही समावेश
भरत खोडकर हा सांगली जिल्हा पोलिस दलात पोलिस शिपाई पदावर कार्यरत आहे. तो देखील आपल्या इतर साथीदारांना वाहन चोरी आणि त्याची विक्री करण्यासाठी मदत करत असे. दरोडा विरोधी पथकाने हा प्रकार उघडकीस आणला. महेश सासवे याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे पाचशेच्या दोन बनावट चलनी नोटा मिळून आल्या.
विमान प्रवास करून करायचा वाहन चोरी
अजीम पठाण याला २०२३ मध्ये सातारा पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून अशाच प्रकारे नऊ चारचाकी गाड्या जप्त केल्या होत्या. अजीम हा दिल्ली येथे विमानाने जात असे. तिथे इतर साथीदारांच्या मदतीने वाहन चोरी करायचा. तिथे चोरलेल्या वाहनांची महाराष्ट्रात कमी किमतीत विक्री करीत असे. त्यासाठी अजीम हा वाहने खरेदी करणाऱ्या नागरिकांना बनावट कागदपत्रे देत होता.